नाशिक : मालेगाव तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांबरोबरच कांद्याच्या रोपांचे ही सुमारे ४० टक्के नुकसान झाले आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिके कमकुवत होऊन खराब झाली. तसेच रोपे पिवळी पडत गेली. परिणामी, यंदा लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. अपेक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा सांधणी व दुबार पेरणीचे तंत्र अवलंबण्यास सुरुवात केली आहे.
कसमादे पट्टयात नगदी पीक असलेल्या कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. येथील जमीन कांदा लागवडीसाठी पोषक असल्याने शेतकरी दरवर्षी लेट खरीप व उन्हाळ कांद्याचे नियोजन करतात. पावसाच्या आगमनापूर्वी तयार झालेला कांदा चाळीत साठविण्याची योजना होती. थंडीच्या हंगामात लागवड केल्यास मार्च-एप्रिलपासून कांद्याची काढणी सुरू होते.
यासाठी बी पेरणी करण्यात आली होती; मात्र सलग झालेल्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे रोपे नष्ट झाली आणि संपूर्ण नियोजन कोलमडले. यंदा पावसामुळे विहिरी भरल्या असून कोरडवाहू भागातही लागवड झाली होती. पावसामुळे तयार केलेल्या सऱ्या व वाफे सपाट झाल्या आणि पुन्हा शेत मशागतीसाठी खर्च करावा लागत आहे.
बियाणांचा साठा संपला
तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. कांदा बियाणे ते स्वतः घरात साठवून ठेवतात, त्यामुळे बाजारातून बियाणे खरेदी करण्याची गरज नसते. मात्र यंदा दोन ते तीन वेळा बी पेरून ही रोपे नष्ट झाल्याने बियाण्याचा साठा संपत आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता महागडे बियाणे बाजारातून २००० ते २५०० रुपये प्रतिकिलो दराने विकत घ्यावे लागत आहेत.
पावसाचा तडाखा पुन्हा बसल्यास हे बियाणे ही वाया जाण्याची भीती आहे. कांद्याचे बाजारभाव फक्त ७०० रुपये क्विंटल असल्याने लागवड करावी की नाही, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मक्याचे ही नुकसान झाल्याने दिवाळीत सण साजरा करण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे उरणार नाहीत.
ग्रामीण भागात कांद्याचे दर कमी -झाल्याने मंदीचे सावट पसरलेले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळाली तरच शेतकऱ्यांचा सण साजरा होईल.
- अमृत कळमकर, शेतकरी, खडकी