Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परंपरागत सोयाबीन पिकावर विश्वास दाखवत पुन्हा सर्वाधिक क्षेत्र त्याखाली आणले असले, तरीही अनेक भागांत पीक पद्धतीत स्पष्ट बदल होताना दिसत आहे.(Kharif Season)
कापूस, हळद, उडीद आणि मुगाच्या लागवडीत वाढ झाली असून, शेतकऱ्यांचा कल नवनवीन पर्यायांकडे वळला आहे.(Kharif Season)
वाशिम जिल्ह्यात ११ जुलै अखेर ९० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. काही दिवस पावसाने उसंत घेतल्यामुळे उर्वरित क्षेत्रावरही कामांना गती मिळाली आहे. (Kharif Season)
कृषी विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात २.६७ लाख हेक्टरवर सोयाबीनचे पीक घेण्यात आले आहे, जे यंदाही सर्वाधिक आहे. त्यानंतर कापूस (२३,१७५ हेक्टर), हळद (१३,४८० हेक्टर), तूर (५६,७२० हेक्टर), तसेच उडीद व मुग यांची पेरणी झाली आहे.(Kharif Season)
पीक पॅटर्नमध्ये बदल
जिल्ह्यातील मानोरा, कारंजा आणि मंगरूळपीर या तीन तालुक्यांत शेतकऱ्यांची पसंती पुन्हा कापूस पिकाला मिळाली आहे. दुसरीकडे, वाशिम, रिसोड आणि मालेगाव या तालुक्यांमध्ये हळद पिकाखालील क्षेत्रात विक्रमी वाढ झाली आहे.
मागील दोन वर्षांत हळदीला मिळालेल्या चांगल्या भावामुळे हळद हे सुरक्षित व फायदेशीर पीक म्हणून शेतकरी बघत आहेत.
पीक | पेरणी क्षेत्र (हेक्टर) |
---|---|
सोयाबीन | २,६७,००० |
कापूस | २३,१७५ |
हळद | १३,४८० |
तूर | ५६,७२० |
११ जुलैअखेर एकूण गळीतधान्याचा पेरा ८९.४६% क्षेत्रावर झाल्याचे नोंदवले गेले आहे. त्यात सोयाबीनचा वाटा ८९.६४% तर तीळाचा १५.६२% आहे.
तालुकानिहाय खरीप पेरणी स्थिती
तालुका | पेरणी क्षेत्र |
---|---|
वाशिम | ६७,४१५ हेक्टर |
मंगरूळपीर | ६८,५७९ हेक्टर |
रिसोड | ६७,२६७ हेक्टर |
मानोरा | ४२,८६४ हेक्टर |
कारंजा | ६१,८६६ हेक्टर |
मालेगाव | ६८,५७९ हेक्टर |
शेतकरी काय सांगतात
आम्ही यंदा सोयाबीनसोबतच कपाशी लागवडीवर विशेष भर दिला आहे. दर दोन वर्षांतील बाजारभाव पाहता हे पीक अधिक फायदेशीर वाटत असल्याने हा निर्णय घेतला. - राजेश कडू, शेतकरी
पावसाची अनिश्चितता आणि कीडरोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हळदीचे पीक हा सुरक्षित पर्याय वाटत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात हळद लागवडीवर भर दिला आहे. - संजय देशमुख, शेतकरी
हळदीचा पेरा उच्चांकावर
जिल्ह्यातील वाशिम (३४१ टक्के), रिसोड (३१९ टक्के) आणि मालेगाव (१९७ टक्के) या तीन तालुक्यांमध्ये हळदीचा पेरा यंदा उच्चांकी पातळीवर आहे.
त्या तुलनेत मंगरूळपीर (४५ टक्के), मानोरा (६ टक्के) आणि कारंजा (२४ टक्के) हे तीन तालुके हळदीच्या पेऱ्यात बहुतांशी माघारल्याचे चित्र दिसत आहे.
यंदाचा खरीप हंगाम सुरळीत सुरू असून शेतकरी जुन्या पीक पर्यायांकडे वळत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील पीक पॅटर्नमध्ये स्पष्ट बदल जाणवत असून कापूस, हळद, उडीद आणि मुगाच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. - आरीफ शाह, एस.ए.ओ., वाशिम