छत्रपती संभाजीनगर : 'मदत करा... मदत करा...' असा हंबरडा सध्या मराठवाड्यासह राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरून उमटत आहे. (Kharif Crop Damage)
नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत; पण त्याचवेळी बांधावर फुटलेले अश्रू आणि रिकाम्या हाताचे भविष्य त्यांच्या दुःखाची साक्ष देत आहेत. (Kharif Crop Damage)
गेल्या दहा दिवसांत मराठवाड्यात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे तब्बल २४ लाख हेक्टरवरील खरीप पिकांचा चिखल झाला. २९ लाख शेतकरी यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. दसरा-दिवाळीसारखे सण दारात असूनही शेतकऱ्यांच्या हातात पिकातून काहीच येणार नाही. (Kharif Crop Damage)
नुकसान
मराठवाड्यातील ५ हजार ८९३ गावे पूरग्रस्त ठरली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७९२ गावे पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला असून जनावरांचे, घरांचे, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
२ लाख २३ हजार ६६१ शेतकरी थेट प्रभावित
१.९६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
४,४१७ घरांमध्ये पाणी शिरले
८८३ घरांची पडझड
८ जणांचा मृत्यू
१५६ जनावरे वाहून गेली
पंचनामे किती झाले?
सरकारच्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यात ७५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. काही जिल्ह्यांचा आकडा धक्कादायक आहे :
परभणी : ९४.८९%
हिंगोली : १००%
लातूर : ७५.५३%
धाराशिव : ८१.३१%
एकूण २३.९६ लाख हेक्टर क्षेत्रातील नुकसानाची नोंद झाली असून, राज्याच्या अनेक भागांत अजूनही अहवाल प्रक्रिया सुरू आहे.
भरपाईचे निकष
सरकारने नुकसानीसाठी २०२३ च्या निकषांनुसार मदत जाहीर केली आहे :
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये
दुधाळ जनावरांना ३७ हजार ५०० रुपये
मेंढी व बकरीसारख्या जनावरांना ४ हजार रुपये
ओढकाम करणाऱ्या जनावरांना २० हजार रुपये
घर पडल्यास ३ हजार रुपये
गोठ्यालाही मदत मिळेल
पिकांसाठी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत
मात्र, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, २०२३ च्या जुन्या निकषांप्रमाणे मदत अपुरी आहे, तर २०२४ च्या नव्या निर्णयानुसार भरपाई हवी. त्यात जिरायतीसाठी १३ हजार ६०० रुपये, बागायतीसाठी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये प्रतिहेक्टर भरपाईचा प्रावधान आहे.
विरोधकांचा आवाज
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करून त्यांना संपूर्ण मदत द्यावी, अशी मागणी केली.
राज्य सरकारची भूमिका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून भरीव मदतीचे निवेदन दिले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना तातडीची मदत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिली जाईल. घर पडलेल्या व जमिनी खरडलेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र मदत मिळेल.
अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत
अकोला जिल्ह्यातील मंडळ अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे ३०० शेतकऱ्यांचे पंचनामे न झाल्याचे समोर आले. या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले असून, दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
मराठवाडा आणि राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल झाले आहेत. पंचनामे ७५ टक्के पूर्ण झाले असले तरी मदत प्रत्यक्षात कधी मिळणार, हाच प्रश्न शेतकरी विचारत आहेत. दसरा-दिवाळीच्या तोंडावर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असून शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, हीच अपेक्षा आहे.