अकोला : गेल्या खरीप हंगामात पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण दिलासा मिळालेला नाही. जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा विमा केवळ दोन महसूल मंडळांसाठी मंजूर झाल्याने उर्वरित शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.(Kapus Pik Vima)
याच पार्श्वभूमीवर आता कापूस पिकाचा विमा कधी आणि किती मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.(Kapus Pik Vima)
सोयाबीन विमा फक्त दोन मंडळांसाठी
जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार ४१५ शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला होता. मात्र, कृषी विमा कंपनीने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईत केवळ कुरुम आणि लाखपुरी या दोन महसूल मंडळांतील शेतकऱ्यांनाच लाभ मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी वंचित राहिल्याची भावना व्यक्त होत आहे.
कापूस विम्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
सोयाबीननंतर आता कापूस पिकाच्या विम्याची घोषणा अपेक्षित आहे. मात्र, खरीप हंगाम तोंडावर असतानाही कापूस विम्याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.
३० हजार शेतकऱ्यांनी काढला कापूस विमा
गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ३० हजार ३० शेतकऱ्यांनी सुमारे २८,१०१ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकाचा विमा काढला होता.
तालुकानिहाय संख्या पाहिली तर
तेल्हारा – ३,३७२
अकोट – ७,५५८
बाळापूर – २,४७९
पातूर – १,४३६
अकोला – ७,८९०
बार्शीटाकळी – ३,४२६
मूर्तिजापूर – ३,८६९
अतिवृष्टीचा मोठा फटका
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसान भरपाईपोटी विमा मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
खरीप तोंडावर; अजूनही प्रतीक्षा
यंदाचा खरीप हंगाम सुरू होण्यास अवघा दीड महिना शिल्लक असताना विमा न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. विम्याची रक्कम मिळाल्यास पुढील हंगामासाठी बियाणे, खते आणि इतर खर्च भागविणे सोपे झाले असते.
शेतकऱ्यांची मागणी
कापूस विम्याचा लाभ तातडीने जाहीर करावा आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सोयाबीन विम्यात मर्यादित लाभ मिळाल्यानंतर कापूस विम्याबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विमा रक्कम वेळेत मिळणे अत्यावश्यक असून, प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.
हे ही वाचा सविस्तर : Pik Vima Yojana : विमा योजना फायदेशीर कोणासाठी? आकडे सांगतात वेगळीच कथा!
अधिक वाचा : Pik Karj Mafi : पीक कर्जमाफीचा गोंधळ; लाभ नेमका कोणाला, कोण राहणार वंचित?
