अहिल्यानगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध व्हॉटस् ऍप ग्रुपमध्ये एक निनावी मेसेज व्हायरल करण्यात येत आहे की, नाशिक जिल्ह्यात लाल कांदाची प्रचंड प्रमाणात आवक वाढल्याने जिल्ह्यातील गावरान कांदा भाव मोठ्या प्रमाणात पडत आहेत, असा निनावी मेसेज व्हायरल करून नगर जिल्ह्यातील गावरान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भीती घालण्यात येत आहे. नाशिक लाल कांदा आवकेची भीती घालून गावरान कांदा भाव पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विनंती करण्यात येत आहे की, नाशिक जिल्ह्यात लाल कांदा पिकाचे अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील लाल कांदा पिकाचे ७० ते ८० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत लाल कांदा आवक रोज फक्त ३० ते ३५ टन आवक होत आहे, ही आवक अत्यंत नगण्य प्रमाणात आहे. त्यामुळे गावरान कांदा भावावर काहीच परिणाम होऊ शकत नाही. परंतु काही लोकांकडून निनावी मेसेज व्हायरल करून कांदा भाव पाडले जात आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन आहे, त्यांनी असे मेसेज फॉरवर्ड करून व्हायरल करू नयेत, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. व्यापारी जर गावरान कांदा अत्यंत कमी भावात खरेदी करीत असतील तर त्यांची तक्रार बाजार समितीच्या सभापती, संचालक, सचिव यांच्याकडे करून करावी. त्याची रीतसर पोहोच घ्यावी. तशीच तक्रार तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व जिल्हा सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी हिंमत करणार असाल तर या लढाईत शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष खांद्याला खांदा लावून ही लढाई लढण्यास तयार आहे. म्हणूनच कांदा भाव पाडण्यासोबतच सोयाबीन, मका, कापूस पिकांचे खरेदीत देखील लूट केली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित शेतमाल विक्री संदर्भात पावत्या सोबत ठेवाव्यात. आणि याबाबत संबंधित बाजार समिती, निंबंधक यांच्याकडे तक्रार करावी.
- नीलेश शेडगे, शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष, अहिल्यानगर
