गडचिरोली : खरीप हंगामातील धान पिकांवर लोंबी शोषणाऱ्या कीटकांचा प्रचंड प्रादुर्भाव दिसून येत असून, अनेक ठिकाणी करपा, तुडतुडा आणि बेरड रोग देखील धानाचे उत्पादन कमी करण्यास कारणीभूत ठरत आहेत. सतत उपाययोजना करूनही कीड व रोग नियंत्रणात न आल्यामुळे शेतकरी हताश व चिंतेत आहेत.
सध्या मध्यम प्रतीच्या धान पिकाची कापणी सुरू आहे. दीर्घ मुदतीचे धान पीक निसवा झालेले आहे. काही ठिकाणी निसव्यावर आहे. अशातच खोडकिडा रोगाचाही प्रादुर्भाव पिकांवर दिसून येत आहे. याशिवाय पाण्याचा योग्य निचरा होत नाही, अशा ठिकाणी आणि नंतर खतांचा वापर जास्त झालेल्या शेतांमध्ये तपकिरी तुडतुडे ही कीड आढळून येत आहे.
परिणामी धानाची पाने पिवळी पडतात आणि नंतर वाळतात. लोंब्या बाहेर पडत नाहीत, पडल्याच तर दाणे पोचट असतात. धान पिकाच्या लोंबीवर हल्ला करणाऱ्या कीटकांची संख्या वाढत असून, लॉबीतील दाणे अपूर्ण राहणे, पिकाचे ओलसरपणा वाढून कुजणे यासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
उपाययोजना कोणत्या कराव्यात? घ्यावा सल्ला
नोंदणीकृत कीडनाशकांची योग्य मात्रेत फवारणी करावी, धान पिकांमधील अंतर राखून योग्य प्रकारे हवा खेळती ठेवावी. तण व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक. तज्ज्ञांच्या सल्ल्याने जैविक कीड नियंत्रणाची साधने वापरावीत, असा सल्ला कृषी तज्ज्ञ आणि कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
वातावरणातील बदलाचा परिणामही धान पिकांवर दिसून येत आहे. लोंबी अवस्थेतच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी कर्मचाऱ्यांचा सल्ला घेऊनच फवारणी करावी.
- धर्मेंद्र गिन्हेपुंजे, उपविभागीय कृषी अधिकारी, गडचिरोली.