नाशिक : जिल्ह्यासह शहरात शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. चांदवड, बागलाण, मनमाड, दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर तालुक्याला पावसाने झोडपून काढले. पावसामुळे कांदा, कांदा बियाणे, मका, हरभरा तसेच डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्याला सोमवारपर्यंत 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
कांदा रोपांवर परिणाम
विशेषतः कांद्याच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे. पावसाच्या पाण्यात कांद्याची रोपे पूर्णपणे भिजून कुजण्याच्या अवस्थेत आली आहेत. आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे कोवळी कांदा रोपे पितळी पडून नष्ट होत आहेत, पात धरू लागलेले कांदे पुन्हा पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तर काही ठिकाणी शेतात उभी असलेली मका पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
द्राक्ष बागांनाही फटका
छाटणी झालेल्या द्राक्षबागा आणि वेलीवर्गीय फळभाज्यांनाही फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे द्राक्ष हंगाम दीड-दोन महिने पुढे ढकलला गेला असून, 'डावण्या' सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी कोवळे शेंडे मोडून गेले चाराच्याही प्रश्न निर्माण झाला आहे.
कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बुधवारपर्यंत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतरण होणार आहे.
३१ ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देश, विदर्भात मध्यम पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
