High-density Cotton Cultivation : विदर्भातील शेतकऱ्यांनी पारंपरिक कापूस लागवडीच्या पद्धतीत बदल करत यंदा अतिघनता (हाय डेनसिटी) कापूस लागवडीचा प्रयोग सुरू केला आहे. (High-density Cotton Cultivation)
या पद्धतीतून उत्पादनात मोठी वाढ होत असल्याचे कृषी विज्ञान केंद्रांच्या (KVK) प्रात्यक्षिकांतून सिद्ध झाले आहे. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळे कपाशीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी थोडेसे चिंतेत आहेत.(High-density Cotton Cultivation )
पारंपरिक पद्धतीवरून आधुनिकतेकडे
विदर्भात गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी पारंपरिक पद्धतीने कापूस घेत होते. बीटी कापसाच्या आगमनानंतर काही बदल झाला, पण लागवडीची शैली बहुतांश जुनीच राहिली.
आता कृषी मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) अतिघनता कापूस लागवड पद्धत सुरू केली आहे. या अंतर्गत कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके दाखवली जात आहेत.
दुप्पट उत्पादनाचा अनुभव
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर घेतलेल्या प्रयोगात गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना हेक्टरी तब्बल १९ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. पारंपरिक पद्धतीने सरासरी उत्पादन ७ ते ९ क्विंटलांपर्यंत मिळते. या तुलनेत हा आकडा दुप्पट असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
खारपाणपट्ट्यातही यश
अतिघनता कापूस लागवड विदर्भासह पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यांत जोरात सुरू आहे. शेतकरी या पद्धतीला चांगला प्रतिसाद देत आहेत. गेल्या वर्षी या पद्धतीतून भरघोस उत्पादन मिळाल्याने यावर्षीही शेतकऱ्यांचा कल या पद्धतीकडे वाढला आहे.
पद्धतीत काय वेगळं?
या पद्धतीत एका एकरात ३.१५ सेंमी अंतराने लागवड केली जाते. झाड वाढल्यावर गळफांदी व शेंडे छाटले जातात. यामुळे झाडाला योग्य वाढ मिळते आणि उत्पादनक्षमता वाढते. झाडांची संख्या वाढवल्यामुळे एकाच क्षेत्रातून अधिक उत्पादन मिळू शकते, असे कापूसतज्ज्ञ डॉ. संजय काकडे यांनी सांगितले.
पावसाची उघाड गरजेची
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अतिघनता कापूस लागवड उत्पादनक्षम असली तरी सध्या सुरू असलेला सततचा पाऊस हा मोठा धोका आहे. पावसाला उघाड मिळाल्यास कापूस अधिक चांगल्या गुणवत्तेचा येईल आणि उत्पादनात आणखी भर पडेल.