नाशिक : रांगडा व उन्हाळी कांद्याची रोपे जगविण्यासाठी परिसरातील शेतकरी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परतीच्या पावसामुळे कांद्याचे बियाणे वारंवार दबले गेल्याने रोपे वेळेत तयार न झाल्याने यंदा कांदा लागवड उशिरा सुरू झाली. त्यामुळे परिसरातील शेतकरी कांदा रोपे जगविण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.
दरवर्षी लाल रांगडा कांदा आणि उन्हाळी कांदा लागवड ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते. मात्र, यंदा दोन वेळा बियाणे टाकूनही अवकाळी पावसामुळे रोपे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. काही शेतकऱ्यांनी उताराच्या जागेवर टाकलेले बियाणे काही प्रमाणात तयार झाले असून, सध्या ती रोपे लागवडीयोग्य झाली आहेत. उशिरा तयार झालेल्या रोपांमुळे उन्हाळी कांद्याची लावणी उशिरा सुरू झाली आहे. पुढील काळात विहिरीतील पाणी कमी होईल, याची जाणीव ठेवून शेतकरी पारंपरिक पद्धत सोडून अत्याधुनिक ठिबक व तुषार सिंचन पद्धतींचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करत आहेत.
गादीवाफा पद्धत, ठिबक सिंचनाचा फायदा
गादीवाफा पद्धतीत दोन ते अडीच फूट रुंद, दीड फूट उंच वरबा तयार करून त्यावर ठिबक लाइन बसवली जाते. ठिबकच्या साहाय्याने वरबा पूर्ण ओला राहतो, खते व खाद्ये देणे सुलभ होते, जमीन भुसभुशीत राहते आणि कांद्याची गळती चांगली होते. विजेच्या भारनियमनामुळे शेतीपंपांना दिवसातून फक्त आठ तास वीज मिळत असल्याने ठिबकद्वारे पाणी बचत आणि श्रम बचत होत असल्याने ही पद्धत लोकप्रिय ठरत आहे.
तुषार सिंचनालाही वाढती पसंती
काही शेतकरी तुषार सिंचनाचा अवलंब करत असून, या पद्धतीत पिकांवर पावसासारखे पाणी पडते. त्यामुळे रोगराई कमी होण्यास मदत होते. कमी पाण्यातही चांगले उत्पादन मिळत असल्याने तुषार पद्धतीलाही शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद दिसून येत आहे. यामुळे पाण्याची बचत, श्रमाची बचत आणि अधिक उत्पादन ही ठिबक व तुषार सिंचनाची वैशिष्ट्ये असल्याने यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीत या पद्धती शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहेत.
सिंचनामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढला
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खामखेडा परिसरातील कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेली रोपे जमिनीतच दाबली गेली. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि त्यात उन्हाळ कांदा पेरणीला झालेला उशीर यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आता तिबार पेरणी केल्यांतर कांदा रोपे जगविण्याचा खर्च वाढळ्याने शेतकऱ्यांचे आर्थिक संकट आणखी वाढणार आहे.
