नाशिक : या वर्षी ५ मे पासून सुरू झालेला पावसाळा अजूनही थांबायचे नाव घेत नसल्यामुळे द्राक्ष छाटणी हंगामही लांबत चाललेला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
एप्रिल छाटणी झाल्यापासून पावसाने सुरुवात केली आहे. दरवर्षी पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर सुरू होतो. कधी कधी पावसाळा सुरू होण्यासाठी जुलै महिनाही उजाडतो. त्यामुळे एप्रिल छाटणी केल्यानंतर द्राक्ष काडीसाठी लागणारे ऊन लागते म्हणजे गर्भधारणेसाठी व्यवस्थित मिळते.
येणाऱ्या गोड्या बार छाटणी म्हणजे ऑक्टोबर छाटणीला द्राक्षाची आवक चांगली होते. ह्या वर्षी एप्रिल छाटणी होऊन मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्याने द्राक्ष काडी परिपक्व झालेली नाही. द्राक्ष बागेवर करप्या आणि डावणी ह्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे.
शेतकरी विवंचनेत
द्राक्ष उत्पादक शेतकरी मेहनत घेत असताना पाऊस थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे सप्टेंबरच्या १ तारखेपासून सुरू होणारा द्राक्ष छाटणी हंगाम अद्याप सुरू होताना दिसत नाही. ज्यांनी छाटण्या केल्या त्यांना बागेमध्ये घड आलेले दिसत नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी विवंचनेत दिसत आहे.
खर्च परवडेना
द्राक्ष काडी परिपक्च करण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाला जेवढा खर्च पूर्ण हंगामात येतो, त्याच्या ७० टक्के खर्च काडी तयार करण्यासाठी झालेला आहे. पावसामुळे बागेत मोठ्या प्रमाणात आसाऱ्या पडल्या असून आता द्राक्ष पूर्व हंगामाची कामे करायला ट्रॅक्टर बागेत चालत नाही. आसाऱ्या भरण्यासाठी मुरूम टाकावा लागत आहे. मजुरीचा खर्च एका ट्रॅक्टरसाठी १८०० ते २००० हजार रुपयांपर्यंत येत आहे.