यंदा खरीप हंगामात सुरुवातीच्या पावसाने दिलासा दिला असला, तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ हवामानाचा शेतकऱ्यांच्या पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे.
कपाशी आणि मक्यावर रोगराई व किडींचा प्रादुर्भाव वाढल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. सोयगाव तालुक्यात यंदा खरीप हंगामात ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. याशिवाय मका, बाजरी, सोयाबीन व ज्वारीसारखी पिकेही चांगली उभी आहेत.
मात्र, वारंवार ढगाळ हवामान, अपुरा पाऊस व दमट वातावरणामुळे पिकांवर बुरशीजन्य रोग व रसशोषक किडींचे प्रमाण वाढले आहे.
मक्यावर लष्करी अळीचा हल्ला
मका पिकावर सध्या लष्करी अळीने जोरदार हल्ला केला असून पानांपासून शेंड्यांपर्यंत संपूर्ण झाडाला ती बाधित करते.
पानांवर छिद्रे पडणे, शेंड्यांची व कळ्यांची नासधूस होणे, कोवळी कणसे खराब होणे असे या अळीमुळे होत आहे. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे पिकांची वाढ खुंटून उत्पादनात मोठी घट येऊ शकते, अशी भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
कपाशीवरही रसशोषक किडी व बुरशीजन्य रोग दिसून येत असून वेळीच उपाय न केल्यास उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची नियमित तपासणी करून वेळेत फवारणी करावी, असे कृषी अधिकारी रमेश गुंडीले यांनी सांगितले.
कृषी विभागाचे शिफारस केलेले उपाय
रासायनिक फवारणी
थायमेथोक्साम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन २.५% @ २.५ मिली/१० लिटर पाणी
स्पिनोटोरॅम ११.७% SC @ ५ मिली/१० लिटर पाणी
क्लोरोनट्रॅनीलप्रोल १८.५% SC @ ४ मिली/१० लिटर पाणी
ही फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
जैविक फवारणी
अॅझाडिरॅक्टरीन १५०० ppm @ ५० मिली/१० लिटर पाणी
मेटारायझियम अनिसोपली @ ५० ग्रॅम/१० लिटर पाणी, सकाळी किंवा संध्याकाळी फवारावे.
ट्रायकोग्रामा बॅक्टरी (ट्रायको कार्ड) @ १.५ लाख अंडी/हेक्टर प्रमाणात सोडावीत.
शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला
पिकांवरील रोग व किडींपासून बचावासाठी वेळेवर उपाय करणे अत्यावश्यक आहे. नियमित तपासणी करून योग्य फवारणी केल्यास नुकसान टाळता येईल.- रमेश गुंडीले, कृषी अधिकारी
सोयगाव परिसरात खरीपातील ५०% क्षेत्र कपाशीखाली.
मका पिकावर लष्करी अळीचा जोरदार प्रादुर्भाव.
कपाशीवर रसशोषक किडी व बुरशीजन्य रोगांची लागण.
वेळेत उपाययोजना केल्यास उत्पादन टिकवता येणार.