गोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर सन २०२३-२४ या वर्षात खरेदी केलेल्या एकूण धानापेक्षा (Dhan Kharedi Ghotala) राइस मिलर्सला भरडाईसाठी प्रत्यक्षात कमी उचल दिली. यात १ कोटी ४३ लाख ७२ हजार ३१० रुपयांची अफरातफर केल्याचे लेखा परीक्षण अहवालात पुढे आले.
याप्रकरणी गोरेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री समितींतर्गत येणाऱ्या तीन धान खरेदी केंद्रांवरील तीन ग्रेडर व दोन केंद्र प्रमुख यांच्यावर लेखा परीक्षकाच्या तक्रारीवरून २९ मार्च रोजी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रमेश राजाराम वट्टी (५२, रा. गोंदेखारी), मयूर देवकन हरिणखेडे (४५, रा. मोहगाव), चंद्रशेखर गिरधारी बोपचे (४५, रा. म्हसगाव), धर्मेंद्र अनिरुद्ध वट्टी (४७, रा. गोंदेखारी), सुदर्शन तोपसिंग ठाकूर (५०, रा. चिल्हाटी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ग्रेडर व केंद्र प्रमुखाची नाव आहे.
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ सेवा सहकारी संस्थाच्या माध्यमातून धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी करते.
यानंतर खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार करून त्याची भरडाई करून सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. पण काही संस्था खरेदी केलेल्या धानाची परस्पर विक्री करीत असल्याचे प्रकार यापूर्वी सुद्धा जिल्ह्यात पुढे आले असून, फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत. असाच प्रकार गोरेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री समितींतर्गत येणाऱ्या तीन धान खरेदी केंद्रावर शनिवारी पुढे आला आहे. यात तीन ग्रेडर व दोन केंद्र प्रमुखांनी खरेदी केलेल्या धानाची अफरातफर करून १ कोटी ४३ लाख रुपयांचा आर्थिक घोळ केल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
खरेदी केलेल्या धानापेक्षा उचल दिली कमी
लेखा परीक्षक हेमंतकुमार टोलिराम बिसेन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गोरेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री समिती मर्या गोरेगावअंतर्गत येणाऱ्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र गोदेखारी, सर्वांटोला, काली माटी येथे संस्थेला मिळालेल्या करारनाम्यानुसार धानाची उचल न देता आरोपींनी राइस मिलर्सला कमी धानाची उचल देऊन स्वतःच्या स्वार्थासाठी संस्थेच्या धान खरेदीमध्ये १ कोटी ४३ लाख ७२ लाख ३१० रुपयांची अफरातफर केली.
लेखापरीक्षणातून फुटले तीन ग्रेडरचे व दोन केंद्र प्रमुखाचे बिंग
गोरेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री समिती मर्या गोरेगावअंतर्गत येणाऱ्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र गोदेखारी, सर्वांटोला, काली माटी या तीन केंद्रांवर कार्यरत तीन ग्रेडर व दोन केंद्र प्रमुखांनीद्ध खरेदी केलेल्या धानाची परस्पर विल्हेवाट लावून घोळ केल्याचे संस्थेच्या लेखापरीक्षणात पुढे आल्याने या प्रकरणाचे बिंग फुटले. सहायक निबंधक सहकारी संस्था गोरेगाव यांच्या लेखी आदेशाने व लेखी तक्रारीवरून पाच आरोपींविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास गोरेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजय भुसारी करीत आहेत.