नाशिक : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना (Swadhar Yojana) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील इयत्ता 11 वी, 12 वी आणि इयत्ता 12 नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांसाठी राबविण्यात येते.
सन 2025-26 साठी या याजनेंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी 31 डिसेंबर, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण, नाशिक चे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
ही योजना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवता यावे यासाठी भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आहे. महाविद्यालयाच्या ठिकाणानुसार रूपये 38 हजार ते 51 हजार प्रतिवर्ष तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी प्रतिवर्ष रूपये 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रूपये 2 हजार इतकी रक्कम देय आहे.
यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या व ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पोर्टलवर बँक तपशील भरण्याबाबत टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी त्वरीत बँक तपशील भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त श्री नांदगावकर यांनी केले आहे.
