Crop Damage in Marathwada : गेल्या आठवड्यापासून मराठवाड्यात पावसाचा जोर वाढल्याने खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. पूरस्थिती, अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे आतापर्यंत सुमारे ४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद महसूल विभागाने केली आहे. (Crop Damage in Marathwada)
या अतिवृष्टीमुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी नोंदही झाली आहे. दरम्यान, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Revenue Minister Chandrashekhar Bawankule) हे २२ ऑगस्ट रोजी विभागातील नुकसानीचा आढावा घेण्याची शक्यता असून, जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन मदत व नुकसानभरपाईसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.(Crop Damage in Marathwada)
ऑगस्ट महिन्यातच सरासरीच्या दीडपट पाऊस
मराठवाड्यात ८ ऑगस्टपासून पावसाने पुन्हा जोर धरला. फक्त एका आठवड्यात झालेल्या पावसामुळे ऑगस्ट महिन्याच्या सरासरी पावसाची दीडपट नोंद झाली आहे.
सरासरी १२४ मिमी पावसाच्या तुलनेत यंदा १८९.३ मिमी (१५१.८ टक्के) पाऊस झाला आहे.
१ जून ते २० ऑगस्टदरम्यान अपेक्षित सरासरी ४४४.९ मिमी पावसाच्या तुलनेत यंदा ४७४.३ मिमी (१०६.६ टक्के) पाऊस नोंदला गेला आहे.
भरपाईसंदर्भात काय निर्णय
मराठवाड्यातील अतिवृष्टीने खरीप हंगामाला मोठा फटका बसला असून, लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून मदत व भरपाईसंदर्भात काय निर्णय होईल याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
जिल्हानिहाय पावसाची नोंद (ऑगस्ट महिन्यात)
जिल्हा | सरासरी पाऊस (मिमी) | प्रत्यक्ष पाऊस (मिमी) |
---|---|---|
छत्रपती संभाजीनगर | ९९ | १३७ |
जालना | १०४ | १४४ |
बीड | ८९ | १८२ |
लातूर | १३० | १६६ |
धाराशिव | १११ | १९४ |
नांदेड | १५९ | २५६ |
परभणी | १४७ | १८२ |
हिंगोली | १५५ | २७४ |
एकूण सरासरी | १२४ | १८९ |
मागील वर्षी याच कालावधीत ४९७.६ मिमी (१११.८ टक्के) पाऊस झाला होता.
पंचनामे सुरू पण संपर्क तुटल्याने अडथळे
महसूल विभागाकडून आतापर्यंत ६६ विभागात पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी पूरस्थिती व संपर्क तुटल्याने पंचनामे करण्यास अडचण येत आहे.
या महिनाअखेरपर्यंत पंचनामे पूर्ण होतील आणि त्यानंतर नुकसानभरपाईसाठी शासनाकडे निधीचा प्रस्ताव पाठविला जाईल.- अनंत गव्हाणे, उपायुक्त, महसूल विभाग