Citrus Fruit Protection : वातावरणातील अनियमित बदल, अधूनमधून पडणारा पाऊस आणि वाढती आर्द्रता यामुळे सध्या संत्रा व मोसंबी बागायतदारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. (Citrus Fruit Protection)
आंबिया बहारात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, अनेक बागांमध्ये फळगळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. (Citrus Fruit Protection)
या पार्श्वभूमीवर सावनेर तालुका कृषी कार्यालय आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने उमरी, सालई, नांदा, गोमुख, मालेगाव, जोगा आदी गावांतील संत्राबागांची पाहणी केली. (Citrus Fruit Protection)
या पाहणीत कृषी महाविद्यालय नागपूर येथील सहायक प्राध्यापक डॉ. रतिराम खोब्रागडे आणि प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल येथील डॉ. प्रमोद पंचभाई यांनी बागांमध्ये कोलेटोटिकम बुरशीचा (Colletotrichum fungus) प्रादुर्भाव असल्याचे स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, या बुरशीमुळे फळांच्या देठाजवळ काळी वर्तुळे (black ring) तयार होऊन फळगळ होते. हा रोग वेगाने पसरण्याची शक्यता असल्याने तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
शास्त्रज्ञांनी सुचविलेले उपाय
बोर्डेक्स मिश्रण ०.६% फवारणी करावी.
कॉपर ऑक्सिक्लोराइड ५०% WP (२.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.
किंवा अझोक्सिस्टोबिन + डायफेनकोनाझोल (१ मि. प्रति लिटर पाणी) फवारणीचा वापर करावा.
बागेतील पाण्याचा निचरा योग्य ठेवावा.
झाडावरील साल काढून टाकावी.
गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत, जेणेकरून संसर्ग पसरू नये.
या पाहणीदरम्यान तालुका कृषी अधिकारी सोमनाथ साठे, मंडळ कृषी अधिकारी दीपाली सरवदे, उपकृषी अधिकारी हरिश्चंद्र मानकर, कृषी सेवक वैष्णवी महल्ले, सहायक कृषी अधिकारी मंगला वाघमारे आणि परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना वेळेवर फवारणी आणि योग्य देखभाल केल्यास फळगळ टाळता येईल, असे मार्गदर्शन केले.