Pune : राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील उभे पिक, माती वाहून गेली असून जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यूमुखी पडलेले एकूण पशुधनाची संख्या ही पावणेदोन लाखांच्या जवळ आहे.
पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात अतिवृष्टीमुळे मोठी जनावरे (जसे की, गाय, म्हैस, बैल), लहान पशुधन (शेळी, मेंढी, वराह) आणि कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाला आहे. गायी, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या मिळून जवळपास १ लाख ७३ हजार ७६१ जनावरे मृत्युमुखी पडले आहेत.
एनडीआरएफ च्या निकषानुसार मदत
अतिवृष्टीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई एनडीआरएफ च्या निकषानुसार देण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली असून अनेक शेतकऱ्यांना भरपाईचे पैसे जमा झाले आहेत.
मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची आकडेवारी
मोठी जनावरे - गायी, म्हशी, बैल, घोडे
मृत्युमुखी संख्या - ४ हजार ८१७
लहान जनावरे - शेळ्या, मेंढ्या, वराह
मृत्युमुखी संख्या - ३ हजार ८७०
कोंबड्या
मृत्युमुखी संख्या - १ लाख ६५ हजार ७४
लंपीचा प्रादुर्भाव आणि काळजी
मागच्या काही दिवसांमध्ये जनावरांमध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत होता. असे आढळून आल्यास आपल्या जनावरांना लवकरात लवकर शासकीय पशू वैद्यकांना दाखवावे. यासोबतच लंपी झालेल्या जनावरांना बाजूला ठेवावे. अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
