बापू सोळुंके
खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना रासायनिक खत विक्रीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. (Agriculture News)
विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील तब्बल १३८ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असून ६ विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.(Agriculture News)
या कारवाईमुळे कृषी सेवा केंद्र चालक, खत व बियाणे विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.(Agriculture News)
खरीप हंगामाआधी कृषी विभागाची मोठी मोहीम
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अनुदानित आणि विनाअनुदानित रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा, यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
यासाठी नुकतीच खत विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.
कृषी विभागाच्या प्रमुख सूचना
* प्रत्येक खत गोणीची विक्री ई-पॉस मशीनद्वारेच करावी
* शेतकऱ्याच्या भूक्षेत्रानुसार खत विक्री करावी
* खत विक्रीची नोंद पारदर्शक ठेवावी
* साठा आणि विक्रीचे आकडे अचूक ठेवावेत
मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून अनेक विक्रेते मनमानी पद्धतीने खत विक्री करत असल्याचे तपासणीत उघड झाले.
१,७२१ विक्रेत्यांची तपासणी
गेल्या १० ते १५ दिवसांत कृषी विभागाने मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवली. विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांच्या माहितीनुसार एकूण १,७२१ खत विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीत गंभीर त्रुटी, नियमभंग आणि संशयास्पद व्यवहार आढळल्याने १३८ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
कोणत्या जिल्ह्यात किती कारवाई?
| जिल्हा | निलंबित परवाने |
|---|---|
| छत्रपती संभाजीनगर | ८५ |
| बीड | ३२ |
| जालना | २१ |
एकूण १३८ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
६ विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द
तपासणीदरम्यान काही विक्रेत्यांकडे गंभीर अनियमितता आढळून आली.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विक्रेत्यांकडील खत साठा, विक्री नोंदी, प्रत्यक्ष व्यवहार यामध्ये मोठी तफावत आढळली.
विशेष म्हणजे संबंधित विक्रेत्यांना 'खत कुणाला विकले?' याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही.
यामुळे कृषी विभागाने त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांना फटका बसू नये, म्हणून कारवाई
खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये, काळाबाजार रोखावा आणि शेतकऱ्यांना योग्य दरात खत उपलब्ध व्हावे, यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
काही भागांत शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने अतिरिक्त उत्पादने खरेदी लावणे, ई-पॉसशिवाय विक्री, साठेबाजी, जास्त दर आकारणे अशा तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या.
'पुन्हा चुका केल्यास परवाने कायमचे रद्द'
विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, निलंबित विक्रेत्यांनी भविष्यातही नियमांचे पालन केले नाही तर त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील.
नियमानुसार शेतकऱ्यांना रासायनिक खतांची विक्री करावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. गंभीर चुका करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील.- सुनील वानखेडे, विभागीय कृषी सहसंचालक
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुढील बाबींची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
* खत खरेदी करताना पावती घ्या
* ई-पॉस व्यवहाराची खात्री करा
* जास्त दर आकारल्यास तक्रार करा
* अनावश्यक उत्पादने घेण्यास नकार द्या
* अधिकृत विक्रेत्याकडूनच खत खरेदी करा
* खरीप हंगामात नियंत्रणावर भर
यंदा खरीप हंगामात खत वितरण आणि विक्री प्रक्रियेवर अधिक कडक नियंत्रण ठेवण्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी तपासण्या आणि कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
