संतोष मगर
परभणी जिल्ह्यात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे भूजल दूषित होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. (Groundwater Report)
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेअंतर्गत कार्यरत प्रयोगशाळांनी तपासलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. (Groundwater Report)
तपासण्यात आलेल्या ३,०१६ नमुन्यांपैकी तब्बल २६५ नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.(Groundwater Report)
सलग दोन वर्षे नायट्रेट प्रदूषण कायम
एप्रिल २०१५ ते मार्च २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध गावांमधून पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. एकूण ३,०१६ नमुन्यांपैकी २,७४३ नमुने योग्य आढळले, तर २७३ नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये सर्वाधिक नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण ४५ मिलिग्रॅम प्रति लिटरपेक्षा अधिक आढळले.
विशेष म्हणजे यापूर्वी २०२४-२५ या वर्षातही ३,०७८ नमुन्यांपैकी ३२५ नमुने दूषित आढळले होते. त्यामुळे भूजलातील नायट्रेट प्रदूषणाची समस्या कमी होण्याऐवजी कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
पाच तालुक्यांमध्ये सर्वाधिक धोका
जिल्ह्यातील परभणी, सेलू, बोरी, गंगाखेड आणि पाथरी येथील प्रयोगशाळांमार्फत पाणी तपासणी करण्यात येते. तालुकानिहाय पाहता पाथरी आणि सोनपेठ तालुक्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे समोर आले आहे.
तालुकानिहाय नायट्रेट दूषित नमुने
| प्रयोगशाळा | संबंधित तालुके | दूषित नमुने |
|---|---|---|
| पाथरी | पाथरी, सोनपेठ | ७६ |
| सेलू | सेलू, मानवत | ६५ |
| बोरी | जिंतूर | ५१ |
| परभणी | परभणी, पूर्णा | ३४ |
| गंगाखेड | गंगाखेड, पालम | २९ |
पाथरी-सोनपेठ भागात सर्वाधिक ७६ नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
खतांच्या अतिवापरामुळे भूजल धोक्यात
तज्ज्ञांच्या मते, रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने जमिनीत नायट्रेट साचते. पावसाचे पाणी जमिनीत झिरपताना हे नायट्रेट भूजलामध्ये मिसळते. परिणामी विहिरी, बोअरवेल आणि हँडपंपातील पाणी दूषित होण्याचा धोका वाढतो.
विशेषतः शेतीप्रधान भागांमध्ये युरिया आणि नायट्रोजनयुक्त खतांचा अतिरेक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ही समस्या गंभीर बनत चालली आहे.
आरोग्यावर गंभीर परिणामांची शक्यता
नायट्रेटयुक्त पाण्याचे दीर्घकाळ सेवन केल्यास अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
संभाव्य आजार
पोटाचे विकार, डायरिया, दातांचे आजार, रक्तदाब वाढणे, थायरॉईड समस्या, पचनसंस्थेचे विकार, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो आहे.
लहान मुलांमध्ये 'ब्लू बेबी सिंड्रोम'चा धोका निर्माण होण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारात रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन त्वचा निळसर पडते.
पाण्याच्या तपासणीत कोणते घटक तपासले जातात?
भूजल प्रयोगशाळांमध्ये रासायनिक आणि जैविक अशा दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात.
रासायनिक तपासणी
वास, रंग, चव, गढूळपणा, पीएच, टीडीएस, अल्कॅलिनिटी, क्लोराइड, नायट्रेट, सल्फेट, हार्डनेस, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम, जैविक तपासणी, कॉलिफॉर्म जीवाणू, थर्मो-टोलरंट जीवाणू यांची तपासणी केली जाते.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यात घातक रासायनिक घटक आढळूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
'पाणी दूषित असल्याचे अहवाल समोर येतात, पण गावपातळीवर जनजागृती, शुद्ध पाणीपुरवठा किंवा पर्यायी व्यवस्था दिसत नाही,' अशी प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी दिली.
तज्ज्ञांचा इशारा
भूजलातील नायट्रेट प्रदूषण थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन आणि नियमित पाणी तपासणी आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अन्यथा आगामी काळात ग्रामीण भागात आरोग्य संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा सविस्तर : Chara Tanchai : चाराटंचाईची चिंता मिटली; शेतकरी तयार करतायत पौष्टिक मुरघास
अधिक वाचा : Soybean Seed : सोयाबीन बियाण्यांवर मोठा खर्च टळणार; कृषी विभागाचा खास सल्ला
