Chara Tanchai : सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा आणि परिसरातील शेतकरी आता आधुनिक पद्धतीने चारा साठवणुकीकडे वळत असून, 'मुरघास' (Silage) निर्मिती दुग्ध व्यवसायासाठी मोठे वरदान ठरत आहे.(Chara Tanchai)
चाराटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मक्यापासून मुरघास तयार करत आहेत. त्यामुळे जनावरांना वर्षभर पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध होत असून दुग्धोत्पादनातही वाढ होत असल्याचे चित्र आहे.(Chara Tanchai)
या भागात शेतीसोबत दुग्ध व्यवसाय हा प्रमुख जोडधंदा मानला जातो. मात्र, दरवर्षी उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होत असल्याने पशुपालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.(Chara Tanchai)
गेल्या काही वर्षांत हवामानातील बदल आणि वाढत्या चाऱ्याच्या खर्चामुळे शेतकरी चिंतेत होते. अशा परिस्थितीत 'मुरघास' निर्मितीचा पर्याय शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
उन्हाळी मक्यापासून पौष्टिक चाऱ्याची निर्मिती
गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने परिसरातील पाणीसाठे मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी मका लागवडीकडे मोठ्या प्रमाणात मोर्चा वळविला.
सध्या मका पीक परिपक्व अवस्थेत आले असून शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मक्याची कणसांसह कुट्टी करून त्याची हवाबंद साठवणूक करत आहेत.
ही कुट्टी विशेष प्लास्टिक पिशव्या किंवा खड्ड्यांमध्ये घट्ट दाबून हवाबंद पद्धतीने साठवली जाते. साधारण ४५ दिवसांनंतर हा मुरघास जनावरांना खाण्यासाठी तयार होतो. या प्रक्रियेमुळे चारा खराब होत नाही आणि दीर्घकाळ टिकून राहतो.
पशुपालकांच्या मते, मुरघासामुळे जनावरांना आवश्यक पोषणमूल्ये मिळतात. त्यामुळे जनावरे तंदुरुस्त राहतात आणि दूध उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
'या' गावांमध्ये मुरघास निर्मितीची लगबग
बनकिन्होळा परिसरातील बाभूळगाव (बु.), भायगाव, निल्लोड, वरखेडी, चिंचखेडा, गेवराई सेमी, कायगाव, गव्हाली आणि तलवाडा या गावांमध्ये सध्या मुरघास तयार करण्याची मोठी लगबग सुरू आहे.
अनेक शेतकरी आता पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चारा साठवणुकीवर भर देत आहेत.
कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील जाणकारांच्या मते, भविष्यातील चाराटंचाई टाळण्यासाठी मुरघास निर्मिती हा अत्यंत प्रभावी पर्याय ठरू शकतो.
कमी खर्चात वर्षभर चारा उपलब्ध होत असल्याने पशुपालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे.
दुग्धोत्पादनात वाढ
जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान असते. मात्र, मुरघासमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. हवाबंद साठवणुकीमुळे चारा वाया जात नाही. तसेच जनावरांच्या आरोग्यात सुधारणा होऊन दूध उत्पादनातही वाढ होत आहे.- बाबासाहेब फरकाडे, शेतकरी
