नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनासाठी आणलेल्या सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवस वीज पुरवठा मिळत असून, ही जगातील सर्वात मोठी विकेंद्रीत सौर निर्मिती योजना असून आगामी काळात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून दिवसा वीज मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील ४ मेगावॅटच्या सौर प्रकल्पास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज रविवारी भेट देऊन सौर प्रकल्पाची पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यासह नाशिक जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
महावितरण व आवादा कंपनीमार्फत मोहाडी येथे ४ मेगावॅट व आंबे दिंडोरी येथे २ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे. या दोन्ही प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या ३३/११के व्ही मोहाडी उपकेंद्र येथे पोहचवली जाते.
या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे मोहाडी उपकेंद्रातील मोहाडी, वरवंडी, शिवनई व कुरनोळी या ११ केव्ही विद्युत वाहिनीमार्फत मोहाडी, कुरनोळी, शिवनई, वरवंडी, आंबे दिंडोरी व गणोरवाडी या गावातील २ हजार ९४० शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा सकाळी नऊ ते पाच या वेळेत अखंडित व पुरेशा दाबाने थ्री फेज विद्युत पुरवठा दिल्या जात आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर हा सौर प्रकल्प उभारण्यात आला असून विजेची निर्मिती सुरू झाली आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थ व सरपंच यांचा पुढाकार पाहून जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होण्यासोबत स्वस्तात वीज उपलब्ध झाल्याने उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्याची संधी भविष्यात मिळणार आहे. या योजनेमुळे कृषी क्षेत्राला मोलाची मदत होणार आहे.
