नाशिक : जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसात झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिके आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसला आहे. प्रशासनाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल ३१९ गावे बाधित झाली असून सुमारे ३६,४०९ शेतकरी या आपत्तीमुळे प्रभावित झाले आहेत.
अहवालानुसार जिरायत व बागायत क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः कांदा पिकाला सर्वाधिक फटका बसला असून सुमारे २१ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. त्याखालोखाल सोयाबीन पिकाचे जवळपास ४ हजार हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे. याशिवाय भाजीपाला, मका, गहू आणि इतर पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुकानिहाय पाहता सटाणा तालुक्यात सर्वाधिक २१ हजारांहून अधिक शेतकरी प्रभावित झाले असून निफाड, सिन्नर, कळवण या तालुक्यांतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इगतपुरी, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचे नुकसान नोंदविण्यात आले आहे. सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, चांदवड तालुक्यात मात्र नुकसान नोंदविण्यात आलेले नाही.
इन्फो
२२९८ फळपिकांना फटका
जिल्ह्यातील २२९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. क्ष, डाळिंब आणि इतर बहुवार्षिक पिकांना देखील फटका बसला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. ६४१ हेक्टरवरील द्राक्ष तर १६१० हेक्टवरील डाळिंबाचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असून अंतिम अहवालानंतर मदतीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
