तिसगाव : अतिवृष्टीमुळे परिसरातील २६ गावांतील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. सर्वाधिक फटका कपाशीला बसला. प्रतवारी घटल्याने दर मिळेना.
अशा दुहेरी हानीतून वाचलेल्या कपाशीची वेचणीसाठी मजूर मिळेनात. काही शेतकऱ्यांनी थेट मध्य प्रदेशातून मजूर आणून कपाशीची वेचणी सुरू केली आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात प्रथमच परप्रांतीय मजूर आणावे लागले आहेत. मुळा पाटचारीच्या कार्यक्षेत्रातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी, कोपरे, पाडळी, चितळी भागात मजुरांची टंचाई जाणवत आहे.
सुटीचा दिवस पाहून शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेत शेतकरी घरच्या घरी कापूस वेचत आहे. भाव कोसळण्यापूर्वीच कापूस विकण्याचे शेतकऱ्यांचे धोरण आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची वाट लागली. शेतकरी रस्त्यावर आला. वेचणीला आलेल्या कापूस पुराच्या पाण्यात वाहून गेला. हलक्या व मध्यम शेतातील कपाशी वाचली.
पावसाने उघडीप दिल्याने मागील काही दिवसांपासून कपाशी वेचणीची कामे सुरू झाली आहेत. मात्र, त्यासाठी मजूर मिळत नाहीत.
ग्रामीण भागात ठेकेदार पद्धत सुरू होऊन मजूर गोळा करणे, त्यांच्या प्रवासाची सोय करणे, असा नवा नवा व्यवसाय सुरू झाला आहे. अगदी १० ते १०० किमीपर्यंत तालुक्यातील मजूर कामाला जातात. मात्र, सुगीच्या दिवसात हे मजूरही मिळत नाहीत.
पाथर्डी तालुक्यात यंदा सुमारे साडेसात हजार हेक्टरवर कपाशी लागवड झाली होती. मात्र, अतिवृष्टीने ७५ टक्के पिकांची वाट लागली. उरलेला कापूस आता वेचणीला आला.
सध्या कापसाला साडेसहा ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जातो. तालुक्याच्या पश्चिम भागात अवघा ५०० ते ६०० हेक्टर कापूस वेचणी योग्य राहिला आहे. त्यात मजूर मिळत नाहीत.
तालुक्यातील शेतकरी अशोक शिदोरे यांनी मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातून मजूर आणले आहेत. साधारण एक मजूर दिवसाला किमान ७० किलो कापूस वेचतो. त्याला १६ रुपये किलोप्रमाणे पैसे द्यावे लागतात.
कमी प्रतवारीच्या कपाशी वेचणीला द्यावी लागणारी मजुरी ही कपाशीच्या पैशांएवढीच निघते. तालुक्यात प्रथमच परप्रांतीय मजुरांकडून कापूस वेचणीची वेळ आली आहे.
मागील वर्षी १० ते १२ रुपये किलोने होणारी कापूस वेचणी यंदा १६ रुपये प्रतिकिलो झाली, तरी मजूर मिळत नाही. कुटुंबातील सर्वजण मिळून कापूस वेचणी करतो. १६०० रुपये प्रतिक्विंटल कापूस वेचणी, बियाणे, नांगरणी, आंतर मशागती, फवारणी अशी सगळी गोळाबेरीज केली, तर कापूस पीक प्रतिक्विंटल १२०० रुपयांनी तोट्यात आहे. - कुंडलिक काजळे, कापूस उत्पादक
अधिक वाचा: पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केल्यास टॅक्स लागतो की नाही? जाणून घ्या सविस्तर
