चेतन धनुरे
धाराशिव : पावसाची वार्षिक सरासरी अवघी ६०० मिमीच्या घरात. निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकून भाळी सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्तांचा जिल्हा म्हणून बसलेला शिक्का.
या कलंकित नोंदी पुसून काढत थेंब थेंब पाण्याचा काटकसरीने वापर करून धाराशिव (dharashiv) 'फ्रूट हब'च्या (Fruit Hub) दिशेने झेप घेत आहे. येथील शेतकऱ्यांनी १५ हजारांवर हेक्टरवर फळबागा विणल्यात.
मराठवाड्याचं देणं केशर आंब्याच्या (Kesar Mango) उत्पादनाबाबतीत तर धाराशिवची (dharashiv) ओळख 'मराठवाड्यातील कोकण' (Konkan of Marathwada) अशी होऊ लागली आहे.
४० डिग्री तापमानातही लालेलाल सफरचंद...
* धाराशिवचे उन्हाळ्यातील सरासरी कमाल तापमान हे ४० डिग्रीच्या वर जाऊन पोहोचले आहे. अशा वातावरणातही शेतकऱ्यांनी सफरचंद उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला.
* इतकेच नव्हे तर ड्रॅगनफ्रूट उत्पादनातही धाराशिव मराठवाड्यात अव्वल आहे. आंब्यापाठोपाठ पेरू उत्पादनातही मोहोर उमटवली आहे. येथील शेतकऱ्यांनी खजूर, वाटर ॲपलसारख्या फळांचेही उत्पादन घेतले आहे.
रोजगार हमीशी जमली गट्टी...
रोजगार हमी योजनेतून फळबागांची लागवड करण्यातही धाराशिवचे शेतकरी अग्रेसर ठरले. यंदा विदर्भ, मराठवाड्यातून धाराशिवचा तिसरा क्रमांक आहे. बुलढाण्यातून ४,५०७ हेक्टर, जालन्यातून १,९९२ हेक्टर तर पाठोपाठ सर्वाधिक १,७८८ हेक्टर क्षेत्रावर फळबागा फुलविण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले.
अतिशय चिकाटीने व उपलब्ध पाण्याचा सूक्ष्म सिंचन पद्धतीने वापर करून धाराशिवच्या शेतकऱ्यांनी फळबागा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. फळबागांच्या शासकीय योजनेला सध्या दुपटीने प्रतिसाद मिळतो आहे. निर्यातक्षम आंबा, द्राक्ष, पेरू उत्पादनात येथील शेतकऱ्यांनी गुणवत्तेचा मानदंड प्रस्थापित केला. - रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी