अहिल्यानगर : जगभरातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एलपीजीला पर्याय म्हणून अंत्योदय व प्राध्यान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना केरोसीन मिळणार आहे.
परंतु अनेक परवानाधारक विक्रेत्यांनी केरोसीन वितरणाला नकार दर्शवला होता. यावर राज्य शासनाने किरकोळ परवानाधारक विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ केली आहे.
इराण-इस्त्रायल, अमेरिका युद्धाचे परिणाम भारतातील एलपीजी सिलिंडर पुरवठ्यावर झाला आहे. यासाठी शासनाने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सिलिंडर बुकिंगची मर्यादा घालून दिली आहे.
याशिवाय सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात पथक स्थापन केले आहे. तरीही काळाबाजार होत असल्याचे निर्दशनास येत आहे.
सिलिंडर बुकिंगची मर्यादा घालून दिल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची हेळसांड होऊ नयेत म्हणून अंत्योदय व प्राध्यान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति कुटुंब तीन लीटर केरोसीन मिळणार आहे.
राज्य शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २ लाख १६ हजार लीटर केरोसीनचे नियतन मंजूर केले आहे. केरोसीन वाटप करण्यापूर्वी शासनाने पुरवठा विभागामार्फत घाऊक, किरकोळ विक्रेते व नागरिकांचा सर्व्हे केला होता.
या सर्व्हेत घाऊक व किरकोळ विक्रेत्यांनी पुरवठा व वितरण व्यवस्था कोलमडली असल्याने नकार कळवला होता. त्यामुळे शासनाने किरकोळ विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी किरकोळ परवानाधारकांना प्रति लीटर ६ रुपये ७५ पैसे कमिशन मिळत होते. आता १ एप्रिल २०२६ रोजी निघालेल्या सुधारित आदेशानुसार प्रति लीटर १३ रुपये ५० पैसे कमिशन मिळणार आहे.
वाहतूक दरात ४० टक्के वाढ
डिझेलची भाववाढ झाल्याने केरोसीनची वाहतूक करताना परवानाधारकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने केरोसीनच्या वाहतूक दरात ४० टक्के वाढ मंजूर केली आहे.
डेपोसाठी भत्ता मंजूर
घाऊक केरोसीन परवानाधारकांना तापमान वाढीमुळे येणारी घट व हाताळणूक करताना येणाऱ्या तुटीमुळे सध्याच्या डेपो दराच्या ०.२५ टक्के इतका भत्ता मंजूर करण्यात आला आहे.
अधिक वाचा: साडेचार फूट सरी ठेवून ८६०३२ उसाची लागवड; उत्पादनात एकरी १६० टनाची मजल मारणार
