राहुरी : वारंवार बैठका घेऊनही कापूस व्यापारी क्विंटलमागे दोन किलोची घट घेण्यावर ठाम आहेत. प्रशासनाने आदेश देऊनही घट आणि काटामारी हे प्रश्न सुटलेले नाहीत. याच प्रश्नावर अडेल भूमिका घेत व्यापाऱ्यांनी राहुरी तालुक्यातील कापूस खरेदी बंद केली.
बुधवारी सायंकाळी दोन किलोची घट कायम ठेवत व्यापाऱ्यांनी काटे सुरु केले आहेत. व्यापाऱ्यांची हुकूमशाही आणि प्रशासनाची ढिलाई, यामुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
सध्या बाजारात ओलसर कापूस येत असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा असला तरी प्रत्यक्षात त्यामागे शेतकऱ्यांना कमी भाव देण्याचा डाव असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
कापूस वेचणीसाठी मजुरांना किलोमागे सतरा रुपये मजुरी द्यावी लागते. तर व्यापारी ६३०० ते ७००० रुपये प्रति क्विंटल दर देत असूनही खरेदीसाठी दुकाने बंद ठेवत आहेत.
व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे बळीराजा पुन्हा कोंडीत सापडला आहे. आज काटे सुरु झाले असले तरी चालू हंगाम अंतिम टप्प्यात आल्याचे कारण सांगून व्यापाऱ्यांनी पुढच्या हंगामात शेतकरी व संघटनांसमवेत बैठक घेऊन एक किलो घटीचा निर्णय मान्य करण्याचे आश्वासन दिले.
साठवणुकीला अडचण, उधारीचा तगादा
कापूस खरेदी ठप्प असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. कापूस साठवण्यासाठी जागा नाही, आणि उधारीवर घेतलेले बी-बियाणे, खते, औषधांचे पैसे देण्यासाठी कृषी सेवा केंद्रचालकांचे फोन सुरू झाले आहेत. वेचणीचे पैसे मजुरांना रोज रोख द्यावे लागतात.
गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी, शेतकरी व संघटनांची बैठक झाली होती. व्यापाऱ्यांमध्ये काही गैरसमज होते. ते दूर करण्यासाठी पुन्हा एकत्रित बैठक घेऊन दुकाने पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना दिल्या जातील. तसेच काटामारी करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. - नामदेव पाटील, तहसीलदार
कापूस खरेदी करताना क्विंटलमागे दोन किलोची घट थांबवावी. शेतकऱ्यांना विनाकारण वेठीस धरू नका. नियमाप्रमाणे दुकानं सुरू करा. - प्रकाश देठे, स्वाभिमानी शेतकरी संघटना
सध्या ओलसर कापूस आहे. मिलपर्यंत कापूस पोहोचवण्यासाठी क्विंटलला साडेतीनशे रुपये खर्च येतो. त्यामुळे क्विंटलला एक किलो घट आम्हाला मान्य नाही. दोन किलो घट ही सुरुवातीपासूनची प्रथा आहे. बैठकीनंतर खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेऊ. - राहुल उदावंत, व्यापारी
अधिक वाचा: महसूल विभागाचे नवे आदेश, आता सात दिवसांत मिळणार शेतरस्ता; जाणून घ्या सविस्तर
