रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील टंचाईग्रस्त मौजे गोळेगणी गावात जलकुंडाचा प्रयोग यशस्वी झाला असून हे गाव फळांचे गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे. येथील या पॅटर्नला शासनाने कोकण विभागासाठी मान्यता दिली असून अनुदानही जाहीर केले आहे. त्यामुळे पाण्याअभावी फळ बागायतीचे स्वप्न अधुरे असेल तर ते पूर्ण करण्याची संधी शासनाने दिली आहे.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली फळबागांच्या पाणी व्यवस्थापनासाठी गोळेगणी गावात जलकुंडाचा प्रयोग केला. शासनाने आता कोकणसाठी ही योजना लागू करीत तांत्रिक निकष व आर्थिक मापदंड निश्चित केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जलकुंड निर्मितीसाठी अनुदान मिळणार आहे.
गोळेगणी पॅटर्न काय ?
■ सन २०१९ मध्ये पोलादपूर तालुक्यातील मौजे गोळेगणी या टंचाईग्रस्त गावामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांनी आंबा व काजू या फळपिकांची लागवड केली. लागवड केलेल्या कलमांना डिसेंबर ते मे या कालावधीत संरक्षित पाणी देण्याकरिता कृषी सहायक मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी नामदेव दगडू येरुणकर यांच्या शेतामध्ये ५४५४५ मी. आकारमानाचे १:०.५० उताराच्या जलकुंडाचे खोदकाम केले.
■ त्याला ५०० मायक्रॉन जाडीचे प्लास्टिक अस्तरीकरण करून ५२,७३१ लिटर संरक्षित पाणीसाठा केला. गावामध्ये अशी २२ जलकुंड उभारण्यात आली आहेत. त्यामुळे गावातील फळबाग लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.
अनुदान किती?
फळबागेच्या १० गुंठे क्षेत्रापासून २५ गुंठे क्षेत्राकरिता एक याप्रमाणे शेतकऱ्यांना एका जलकुंडासाठी १६ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. खोदकामासाठी ६,५०० रुपये तर प्लास्टिक कागद टाकण्यासाठी ९,५०० रुपयांची तरतूद आहे. गोळीगणी हे गाव कोकण फळबाग लागवड करता मॉडल व्हिलेज म्हणून काम करेल. जिल्हा नियोजन व विकास निधी यामधून रायगड जिल्ह्यात जास्तीत जास्त जलकुंड करण्याचा आमचा मानस आहे, असे पोलादपूर तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांनी सांगितले.
पावसाळ्यानंतर उर्वरित काळासाठी (डिसेंबर ते मे) आंबा किंवा काजू कलमांना प्रति आठवड्यास प्रति झाडास दहा लिटर पाणी पुरेसे होते. जलकुंडातील पाण्याचा बाष्पीभवनामुळे पाणीसाठी आटण्याची शक्यता असते. त्यामुळे बांबूच्या पट्ट्या आणि गवत वापरून तयार केलेल्या सलद्याने खड्डा झाकून ठेवावा. यामुळे मोकाट जनावरे किंवा वन्य प्राणीदेखील तळ्यातील पाणी पिणार नाहीत. - नामदेव येरुणकर, गोळेगणी, शेतकरी.
हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात