छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याचा पाणलोट क्षेत्रात समावेश झाल्याने रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरींसाठी मिळणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पूर्वी शासनाकडून सिंचन विहिरींसाठी तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात होते.
सोयगाव तालुक्यात सिंचन विहिरींच्या अनुदान योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांनी बागायती, फळबागा व विविध पिकांची लागवड करून उत्पादन वाढविले. विहिरींमुळे शेतांना पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली होती.
शासनाने सोयगाव पाणलोट तालुक्याचा क्षेत्रात समावेश केल्यानंतर सिंचन विहीर योजनेचा लाभ बंद करण्यात आला. सध्या नव्याने पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. तालुक्यातील शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामापुरतेच उत्पादन घेता येत असून, उर्वरित काळात शेती पडीक ठेवावी लागत आहे.
रोजगार हमी योजनेतून पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना सिंचन विहिरींसाठी अनुदान देण्यात आले होते. मात्र, तालुक्याचा पाणलोट क्षेत्रात समावेश झाल्यानंतर शासनाच्या निर्णयामुळे हा लाभ देणे थांबविण्यात आले आहे. - शिवाजी यमूलवाड, बीडीओ, सोयगाव.
ग्रामपंचायतीमार्फत सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव दिला होता. शासनाच्या सुधारित निर्देशांनुसार प्रस्ताव सादर केला, परंतु वारंवार पाठपुरावा करूनही मंजुरी मिळाली नाही. इतर गावांना लाभमिळाला, मात्र घोसला गावातील शेतकरी वंचित राहिले. - युवराज पाटील, शेतकरी, घोसला.
अल्पभूधारक व दुर्बल शेतकरी अडचणीत
• अल्पभूधारक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाशिवाय विहीर खोदणे शक्य नसल्याने त्यांना शेती उत्पादनात नुकसान सहन करावे लागते.
• काही शेतकऱ्यांना पाण्यासाठी शेजारील शेतकऱ्यांकडे शेती गहाण किंवा बटाईवर द्यावी लागत असल्याची स्थिती आहे.
• पूर्वी शासनाकडून सिंचन विहिरींसाठी ३ लाख रुपये अनुदान दिले जात होते. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांनी बागायती, फळबागा व पिकांची लागवड केली आहे.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
