Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या या जिल्ह्यात मृग बरसलाच नाही; खरीप हंगामातील पेरणी २० टक्केच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 10:48 IST

शेतकरी बांधव आता आर्द्राच्या प्रतीक्षेत ..

यंदा मान्सूनने अकोला जिल्ह्यात विखुरता स्वरुपात एंट्री केली आहे. कुठे चांगला, तर कुठे कमी, असा विरळ स्वरुपाचा पाऊस झाला. काही भागात दणक्यात आगमन केल्याने तेथे शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली आहे, तर काही भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याने तिफन थांबली आहे. जिल्ह्यात दि.२२ जूनपर्यंत २० टक्के पेरणी आटोपली आहे.

गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला होता. यावर्षी मान्सूनने जून महिन्यात दगा दिल्याने दि.२२ जूनपर्यंत फक्त २० टक्केच खरिपाची पेरणी झाली आहे. मान्सूनचे आगमन पुढे लांबल्यास यावर्षी खरिपाच्या पेरण्या विलंबाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात पातूर, तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळी तालुक्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. सध्या शेतशिवारात पीक अंकुरले आहे.

परंतु गत चार-पाच दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने अंकुरलेली पिके धोक्यात आली असून, खरीप हंगामातील पेरण्याही खोळंबल्या आहेत. बार्शीटाकळी तालुक्यातील ग्रामीण भागात दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांसमोर उभे आहे. 

मृग बरसलाच नाही; आर्द्रापासून अपेक्षा!

यावेळी ७ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात झाली. त्यापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मशागत केली, त्यातच मान्सूनचे आगमन तीन दिवस अगोदर झाल्याने शेतकरी सुखावला. जिल्ह्यात १० जूनला जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आला. परंतु त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. शुक्रवारपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

मृगाच्या पावसावरच शेती व उत्पादनाची दिशा ठरते. मृगात पेरण्या झाल्यास पिके चांगली येतात. पेरणी जितकी उशिरा तेवढा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यावर्षी मृगात जेमतेम पाऊस बरसला. दि. २० जून रोजी मृग नक्षत्र संपले असून, २१ जून रोजी आर्द्रा नक्षत्र सुरू झाले आहे. या नक्षत्राचे वाहन मोर असल्याने येत्या सोमवारपर्यंत पावसाची प्रतीक्षाच असणार आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात असा झाला पाऊस (आकडे मि.मी. मध्ये)

अकोट १०१.८

तेल्हारा ६१.४

बाळापूर ९४.७

पातूर १४३.४

अकोला ८६.६

शिरटाकळी ११९.२

मूर्तिजापूर ९२.१

हेही वाचा - White Jamun Success Story बुटक्या जातीचे सफेद जांभूळ शेतकऱ्यांसाठी वरदान

टॅग्स :पाऊसखरीपशेतकरीशेतीलागवड, मशागतपीक व्यवस्थापनशेती क्षेत्रअकोलाविदर्भ