जळगाव जिल्ह्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान वेगवेगळ्या तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ तालुक्यांतील ३२४ गावांमध्ये तब्बल ५७ हजार २८९ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके पाण्यात गेली आहेत.
गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक नुकसान या चार दिवसांत झाल्याचे कृषी विभागाने दिलेल्या अहवालातून समोर आले आहे. ८० हजार शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत.
गेल्या चार दिवसांत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, एरंडोल, जामनेर, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, पारोळा या तालुक्यांमधील अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. ३३ टक्क्यांपेक्षा मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
पावसाचे पाणी शेतांमध्ये जाऊन शेतांमधील पिके अक्षरशः बाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. याआधी सप्टेंबर महिन्यातच झालेल्या पावसामुळे ४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
