जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील बिडगाव शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने एका शेतात घुसून सुमारे ७०० केळीघड कापून फेकून दिले.
ज्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, बिडगाव येथील कुर्बान नबाब तडवी हे सध्या किनगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी बिडगाव शिवारातील आपल्या शेतात सुमारे ५ हजार केळीच्या झाडांची लागवड केली होती. मेहनत, वेळ आणि खर्च करून वाढवलेली ही केळी पीक सध्या कापणीसाठी अगदी तयार स्थितीत होती.
दरम्यान तडवी येत्या १५ दिवसांत केळी बाजारात विक्रीसाठी पाठवणार होते. मात्र, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या शेतात घुसून ७०० केळीघड निर्दयपणे कापून जमिनीवर फेकून दिले. यामुळे केवळ उत्पन्नाचे नुकसानच नाही, तर मनस्ताप व मानसिक धक्का देखील तडवी यांना बसला आहे.
शेतकऱ्यांमध्ये संताप; कारवाईची मागणी
स्थानिक शेतकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घ्यावा आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, शासनाने कुर्बान तडवी यांना नुकसानभरपाई द्यावी, अशीही जोरदार मागणी होत आहे.