शरद कासार
अहिल्यानगर तालुक्यातील संत्रा पिकावर पहाटे पडणारे धुके, रात्रीची थंडी, दिवसाचे कडक ऊन, अशा बदलत्या हवामानाचा फटका बसू लागला आहे. यामुळे संत्र्यावर लाल कोळी, कोळशी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
या रोगामुळे संत्रा फळांवर लाल चट्टे, काजळी पडली आहे. रोगाचा प्रादुर्भाव झालेला संत्रा कवडीमोल भावाने विकावा लागणार आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
वाळकी पट्टयातील सारोळा कासार, खडकी, खंडाळा, तांदळी वडगाव, वडगाव तांदळी, देऊळगाव सिद्धी, पारगाव मौला, बाबुर्डी घुमट, आरणगाव, राळेगण म्हसोबा, गुंडेगाव, सांडवा, मांडवा, उक्कडगाव, दशमीगव्हाण, दहीगाव, साकत आदी गावात मोठ्या प्रमाणावर संत्रा फळबाग लागवड केली आहे.
सध्या संत्रा बागा असलेल्या या गावांमध्ये रात्रीची थंडी, पहाटेचे धुके, दिवसा ऊन अशा बदलत्या विषम हवामानाची स्थिती दररोज आहे. यामुळे संत्रा पिकावर मोठ्या प्रमाणात लाल कोळी व कोळशी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.
संत्रा बागांसह लिंबू, डाळिंब, इतर फळबागा, रब्बी हंगामातील कांदा, गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांवरही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सर्वाधिक फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. फळबागांसह रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानीचे शासनाने व कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
संत्रा पिकावर काजळी, कोळशी रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांनी कॉन्फिडॉर अर्धा मिली, हेकझाकों निझोल एक ते दोन मिली प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी. लाल कोळीसाठी ओमाईटची एक मिली प्रति लिटर प्रमाणात फवारणी द्यावी. रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच संबंधित शेतकऱ्यांनी फळबागेचे फोटो मला व्हॉट्सअॅपला पाठवावेत. माझ्याशी संपर्क करावा. त्यामुळे तुम्हास वेळोवेळी मार्गदर्शन करता येईल. - संतोष उगले कृषी सहायक, वाळकी.
संत्रावर कोळशी, लाल कोळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. संत्रा फळाला लाल चट्टे, काळे चट्टे पडले आहेत. त्यामुळे मोठा आर्थिक फटका आम्हास बसणार आहे. फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांवरही रोगाचा प्रादुर्भाव आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई, विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळावी. - नवनाथ मल्हारी बोठे, संत्रा उत्पादक शेतकरी, वाळकी.