सातारा : 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार खासगी रुग्णालयांमध्ये मिळण्याची सुविधा आहे.
मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्मान कार्ड काढताना येणाऱ्या जाचक अटींमुळे अनेक नागरिक हतबल झाले आहेत.
कार्ड सध्या आयुष्मान महाईसेवा केंद्रांमार्फत काढून दिले जात आहे. परंतु, हे कार्ड फक्त ज्या नागरिकांना रेशनिंग मिळते, त्यांनाच दिले जात असल्याचे चित्र आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अनेकांकडे वैध रेशनकार्ड असूनही, तांत्रिक अडचणी, अपूर्ण माहिती, नावातील तफावत किंवा ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी यामुळे आयुष्मान कार्ड काढता येत नाही.
परिणामी, पात्र असूनही अनेक कुटुंबे या महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित राहत आहेत. नागरिकांना ग्रामीण व निमशहरी भागातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी मोठी रक्कम उभारणे अशक्यप्राय आहे.
अशा वेळी आयुष्मान योजनेचा आधार मिळणे गरजेचे असताना, कार्ड मिळण्यातच अडथळे येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
काय अडचणी येताहेत?
◼️ आयुष्मान कार्ड काढण्यासाठी महा ई-सेवा केंद्रात गेल्यानंतर तेथील कर्मचारी तुम्हाला रेशनिंग मिळतेय काय, असा पहिला प्रश्न करतात.
◼️ जर रेशनिंग मिळत असेल, तरच तुम्हाला हे कार्ड काढता येईल, असेही त्यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यामुळे अनेकांचा हेलपाटा होत आहे.
नागरिकांचे म्हणणे काय?
सरसकट सर्व रेशनिंगधारकांना ऑनलाईन बारा अंकी नंबर द्यावा. यासाठी पुरवठा विभाग, तसेच तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.
रेशनिंगकार्डवर बाराअंकी नंबर हवा
◼️ एखादा रुग्ण तातडीने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर महात्मा फुले जनआरोग्य व्यवस्थापनाकडून तातडीने दखल घेतली जात आहे.
◼️ संबंधित रुग्णाच्या रेशनिंगकार्डवर बारा अंकी ऑनलाईन नंबर तहसीलदारांकडून घेतला जात आहे. जेणेकरून संबंधित रुग्णाला आयुष्मान योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.
◼️ परंतु, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच जर रुग्णाकडे आयुष्मान कार्ड असेल, तर पुढची धावाधाव रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागणार नाही. यासाठी प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे.
पूर्वी रेशनिंगची अट होती, परंतु आता अशी अट नाही. तहसीलदारांनी सर्व रेशनिंग ऑनलाईन करून बारा अंकी नंबर द्यावेत. तरच, सर्वांना आयुष्यमानचा लाभ घेता येईल. - डॉ. देवीदास बागल, समन्वयक, आयुष्मान भारत योजना, सातारा
अधिक वाचा: जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल; नववर्षात आता कुणाला मिळणार किती धान्य?
