खुल्या बाजारात शेतमालाच्या दरात सारखी चढ-उतार होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शेतमाल तारण योजना राबविली जाते. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असली तरी या योजनेसाठी शेतकरी उत्सुक दिसून येत नाही.
यातून केंद्रीय वखार मंडळातील साठवणूकदार शेतकऱ्यांचा आकडा निरंक असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे, तर राज्य वखार महामंडळात बोटावर मोजता येतील इतकेच शेतकरी आहेत.
गत तीन वर्षापासून शेतमालाचे दर प्रारंभीच्या काळात तेज होतात. नंतरच्या काळात शेतमालाचे दर घसरतात. यानंतर दुसऱ्या वर्षी या शेतमालाच्या किमती आणखी खाली येतात. यातून गोदामात ठेवलेल्या शेतमालाचा खर्च वाढतो. सोबत कर्ज आणि व्याजाची रक्कमही भरावी लागते. यामुळे शेतकऱ्यांनी वेअर हाऊसमध्ये शेतमाल ठेवण्याकडे पाठ फिरविली आहे.
तूर्त ही योजना शेतकऱ्यांना तारक न ठरता नुकसानदायक ठरत आहे. यातून शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी गोदामात जागा आरक्षित असली तरी अशा ठिकाणी शेतकरी फिरकले नाही.
शासनाच्या एका चांगल्या योजनेला खुल्या बाजाराच्या बदलत्या धोरणाने चांगलाच फटका बसला आहे. यातून शेतकरी धास्तावले आहेत. शेतमाल कधी विकावा, याचाच प्रश्न त्यांच्यापुढे कायम उभा ठाकलेला आहे.
काय आहे शेतमाल कृषी तारण योजना?
• या योजनेत शेतकऱ्यांना आपला शेतमाल शासकीय वेअर हाऊस अर्थात गोदामात ठेवता येतो. गोदामात ठेवलेल्या एकूण शेतमालाला बाजार दराच्या ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. या रकमेवर व्याज आकारले जाते.
• दर वाढल्यानंतर शेतकऱ्याला आपला शेतमाल बाजारात विकता येतो. यावेळी तारण म्हणून दिलेली रक्कम कापली जाते. या काळात दर वाढले तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना होतो. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होते.
वेअर हाऊसमध्ये २५ टक्के जागा आरक्षित आहे. या ठिकाणी शेतमाल ठेवण्यासाठी भाडे आकारले जाते. त्यावर शेतकऱ्यांना ५० टक्के सूट आहे. मात्र, दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यातून शेतकऱ्यांचा ओढा कमी झाला आहे. - कवडू दिवटे, साठा अधीक्षक, राज्य वखार महामंडळ, यवतमाळ.
व्याजदर किती?
या ठिकाणी मिळणाऱ्या तारणावर वार्षिक सहा टक्के व्याजदर आकारले जाते. आठ महिन्यांच्या वर १२ टक्के व्याजदर आकारले जाते. यावर नाममात्र व्याजदर आकारले जाते.