पवनार (जि. वर्धा) : कपाशीच्या एचटीबीटी बियाण्याची लागवड करण्यास देशात प्रतिबंध आहे. तरीही राज्यात लाखो हेक्टर जमिनीवर कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्याची लागवड होत असून गट वर्षी राज्यात जवळपास २५ टक्के क्षेत्रावर सदर बियाण्याची लागवड करण्यात आली होती.
या वर्षी हाच आकडा ४० टक्क्यांच्या वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात प्रतिबंधित बियाणे येऊ नये, यासाठी कृषी विभागाचे भरारी पथक, पोलिस विभाग लक्ष देऊन असतो. मात्र, शेजारील राज्य जसे आंध्र प्रदेश, गुजरातमधून प्रतिबंधित बियाणे छुप्या मार्गाने राज्यात येत असून ते विकणारे दलाल सक्रिय झालेले आहे. मात्र, कृषी विभाग जाणूनबुजून कानाडोळा तर करीत नाही ना? ही शंका निर्माण होते.
२००५ साली शेतकऱ्याच्या आंदोलनानंतर कापसाच्या बीजी १ व बीजी २ या वाणांना परवानगी दिली होती. मात्र, बीजी ३ वाणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन जैवविविधतेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून परवानगी नाकारण्यात आली.
गुजरात, आंध्र प्रदेशातून येतात जिल्ह्यामध्ये प्रतिबंधित बियाणे
गुजरात, आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात कापूस पीक घेतले जाते. याच राज्यातून प्रतिबंधित बियाणे महाराष्ट्रात येत असून विक्री करणाऱ्यांची एक साखळी आहे. एजंटमार्फत विविध गावात याचा प्रचार प्रसार केला जातो. गावातील एखादी प्रमुख हेरून त्याचे वतीने बियाण्याची विक्री केली जाते. याचे कुठेही बिल दिले जात नाही, अशी अनेक शेतकऱ्यांची ओरड आहे.
चोर मार्गाने येणाऱ्या बियाणांना आळा घालावा
• या बियाण्यांवर तणनाशकाचा वापर करता येतो. त्यामुळे लागणाऱ्या खर्चात मोठी बचत होत असल्याने शेतकरी बेकायदेशीररीत्या छुप्या मार्गाने बियाणे खरेदी करून याची लागवड करीत असतात.
• तणनाशकाचा अति वापर झाल्यास जमिनी निकृष्ट होत असल्याची जागृती मात्र, शेतकऱ्यांमध्ये झाल्याचे दिसून येते नाही. यामुळे जमीनीची पोत खराब होते. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
• बीजी ३ ला परवानगी मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. मात्र, बीजी ३ चे अधिकृत बियाणे नसल्याने कुठलेही वाण बीजी ३ चे नावावर देऊन शेतकऱ्यांची फसगत होण्याची मोठी शक्यता आहे.
• शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यासाठी एकतर बीजी ३ वाणाला परवानगी द्यावी, अन्यथा चोर मार्गाने येणाऱ्या बियाण्यांना आळा घालून शेतकऱ्याचे नकसान थांबवावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
हेही वाचा : रेबिज बाधित जनावरांचे दूध सेवन केल्यास रेबिज होतो का? वाचा काय सांगताहेत तज्ञ