मागील काही दिवसात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे, कापूस पिकात फुलकीडे यांचा प्रादूर्भाव वाढला आहे याच्या व्यवस्थापनासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
- 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7% 168 मिली किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
- कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत.
- कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली (पूर्वमिश्रीत किटकनाशक) प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.
- कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
तूर, भूईमुगात साठलेले पाणी काढा बाहेर
- मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पाऊस झालेल्या ठिकाणी कापूस, तूर, भुईमूग पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
- तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
- पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या मुग/उडीद शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
- मागील काही दिवसात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे, भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
- काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून घ्यावी. रब्बी ज्वारीची लागवड मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. हलकी जमिन शक्यतो टाळावी कारण अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता राहत नाही मग पिकाच्या संवेदनशील काळात पाणी कमी पडते. रब्बी सूर्यफुलाची लागवड मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या, उत्तम निचरा असणाऱ्या व जमिनीचा सामू 6.5 ते 8 असणाऱ्या जमिनीत करावी. पाणथळ किंवा आम्लयूक्त जमिन लागवडीसाठी टाळावी.
फळबागेचे व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या केळी बागेत कुकुम्बर मोझॅक विषाणू ग्रस्त रोपे दिसून आल्यास उपटून नष्ट करावीत. मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पाऊस झालेल्या ठिकाणी केळी, द्राक्ष व सिताफळ बगेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीची पूर्व तयारी पावसाचा अंदाज बघून करावी. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पूर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
- काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे, भेंडी व काकडी वर्गीय पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्युटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
- भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
- काकडीवर्गीय पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास क्लोरोथॅलोनिल 75% डब्ल्यूपी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्यूकोनॅझोल + ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबीन 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पाऊस झालेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
फुलशेती
गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पाऊस झालेल्या ठिकाणी फुल पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
पशुधन व्यवस्थापन
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
सामुदायिक विज्ञान
बालविकासाकरिता बालकांना त्यांच्या वयास व विकासात्मक पातळीस अनुसरून मनोरंकरित्या बडबडगीते व गाणी म्हणासवयास लावा. कारण विविध गाण्यातून बालकांचा शब्दसंग्रह, सामान्यज्ञान, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती विकसित होते. इतरांसमोर गाणी गायल्यामूळे आत्मविश्वास वाढुन त्यांची व्यक्तिमत्व विकासास मदत होते.