Lokmat Agro >शेतशिवार > पावसाचा खंड पडलाय? काळजी करू नका; असे करा खरीप पिकांसह फळबागांचे व्यवस्थापन

पावसाचा खंड पडलाय? काळजी करू नका; असे करा खरीप पिकांसह फळबागांचे व्यवस्थापन

how to manage kharif crops in case of rain break | पावसाचा खंड पडलाय? काळजी करू नका; असे करा खरीप पिकांसह फळबागांचे व्यवस्थापन

पावसाचा खंड पडलाय? काळजी करू नका; असे करा खरीप पिकांसह फळबागांचे व्यवस्थापन

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा खंड पडला आहे, त्यामुळे पिके अडचणीत आली आहेत. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने कृषी हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा खंड पडला आहे, त्यामुळे पिके अडचणीत आली आहेत. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने कृषी हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकात आणि उशीरा पेरणी केलेल्या तूर पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. 

मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामूळे, कापूस, तूर, मुग/उडीद व भुईमूग पिकात दहा दिवसापेक्षा जास्त पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. पाण्याच्या ताणामूळे पाने सुकत असल्यास पिकास उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. 

कापूस पिकातील किडींचा बंदोबस्त
कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव वाढला आहे याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रीड 20% 40 ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7% 168 मिली प्रति एकर फवारणी करावी. 

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून फवारावे. 

तूर पीकाचे व्यवस्थापन
तूर पिक 55 ते 60 दिवसाचे झाले असल्यास तूरीचे शेंडे खुडावे यामूळे तूर पिकाला जास्तीत जास्त फांद्या फुटतात. वेळेवर पेरणी केलेल्या तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

पाण्याच्या ताणामूळे पाने सुकत असल्यास पिकास उपलब्धतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर फवारणी करावी. 

भुईमूग पिकाचे व्यवस्थापन
उशीरा पेरणी केलेल्या भूईमूग पिकातील तणांचे नियंत्रण करावे. पाण्याच्या ताणामूळे पाने सुकत असल्यास पिकास उपलब्धतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. 

भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या भुईमूग  पिकात अऱ्या सुटण्याच्या अवस्थेत शक्य असल्यास भुईमूगाच्या पिकावरून रिकामे ड्रम फिरवावे. त्यामूळे अऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होऊन शेंगाची संख्या वाढते परिणामी उत्पादनात वाढ होते. 

मका पिकाचे व्यवस्थापन
उशीरा पेरणी केलेल्या मका पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दिर्घ खंडामूळे, मका पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. 
मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  80 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 80 मिली प्रति एकर वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे असे करा व्‍यवस्‍थापन
नविन लागवड केलेल्या केळी, आंबा व सिताफळ बागेत हलकी कोळपणी करावी जेणेकरून बागेतील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. 

मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामूळे, केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. 

काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेत नवीन फुटणाऱ्या फुटव्यांवर भूरी व करपा या रोगाचा प्रादूर्भाव दिसू शकतो, त्यामूळे अतिरिक्त असलेल्या फुटी काढून टाकाव्यात व आवश्यक फुटी तारांवर व्यवस्थित बांधून घ्याव्यात.  त्यामुळे आर्द्रता कमी होऊन वेलींमध्ये हवा खेळती राहील. 

सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला पिकांची काळजी
भाजीपाला पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामूळे, भाजीपाला पिकात दहा दिवसापेक्षा जास्त पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. 

भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Web Title: how to manage kharif crops in case of rain break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.