हिवाळ्यात थंडीचा प्रभाव वाढल्याने शरीराला तहान कमी लागते. त्यामुळे अनेक जण नकळत फारच कमी पाणी पितात.
मात्र, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास डिहायड्रेशन होऊन शरीरातील अनेक कार्यप्रणालींवर विपरीत परिणाम होतो. यामुळे किडनीचे फिल्टर मंदावणे, रक्त घट्ट होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
थंडीमुळे त्वचेतील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. घाम कमी येतो आणि मेंदूला तहान जाणवण्याचे संकेतही मंदावतात. परिणामी 'तहान लागत नाही' म्हणून पाणी टाळले जाते, हीच सवय डिहायड्रेशनकडे नेते.
शरीरातील द्रवांचा समतोल बिघडल्यामुळे इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात, मेटाबॉलिझम मंदावतो आणि किडनीवर ताण येतो.
अल्प प्रमाणात पाणी पिण्याने थकवा, डोकेदुखी, चक्कर, त्वचा कोरडी पडणे, बद्धकोष्ठता, एकाग्रता कमी होणे, लघवीचा रंग गडद होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
दीर्घकाळ असेच राहिल्यास किडनी स्टोन, युरिनरी इन्फेक्शन, उच्च रक्तदाब किंवा मेंदूतील रक्ताभिसरणातील तक्रारीही उद्भवू शकतात.
दररोज किती पाणी प्यावे?
◼️ प्रौढ पुरुषांनी रोज सुमारे २.५ ते ३ लिटर आणि महिलांनी २ ते २.५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
◼️ तहान लागेपर्यंत वाट पाहू नये, तर दर १-२ तासांनी थोड्या प्रमाणात पाणी प्यावे.
◼️ सकाळी उठल्यावर, बाहेरून आल्यानंतर व झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी घेणे फायदेशीर ठरते.
◼️ हिवाळ्यात सामान्य तापमानातील किंवा कोमट पाणी अधिक योग्य ठरते.
◼️ गार पाण्यामुळे पचन मंदावते व घसा, छातीच्या तक्रारी वाढवू शकते.
◼️ सकाळी आणि जेवणानंतर थोडे कोमट पाणी प्यायल्यामुळे फायदेशीर ठरते
जास्त पाणी पिणे घातक
अतिप्रमाणात पाणी पिल्यास शरीरातील सोडियमचे प्रमाण धोकादायकरीत्या कमी होते. त्यामुळे मेंदूवर सूज येणे किंवा किडनीवर ताण येऊ शकतो. त्यामुळे 'थोडं थोडं पण नियमित' हेच योग्य सूत्र आहे.
हिवाळ्यात शरीरातील पाणी १० ते १५ टक्क्यांनी कमी होते. रक्त घट्ट होते व किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. जेवण सुरू करण्यापूर्वी व जेवणानंतर एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. ठरावीक वेळाने पाणी पिण्याच्या सवयीने थंडीतही आवश्यक पाणी पिता येईल. - डॉ. प्रणिता अशोक, आहारतज्ज्ञ
हिवाळ्यात ताजे गरम अन्नाचे सेवन, गरम किंवा कोमट तापमानातील पाणी पिणे हितकारक आहे. गार पाणी 'आम' वाढवते व पचनशक्ती कमी करते. दिवसातून ७-८ वेळा पाणी पिणे सर्वोत्तम आहे. - वैद्य विनेश नागरे, आयुर्वेद तज्ज्ञ
अधिक वाचा: रासायनिक खतांच्या दरामध्ये झाली पुन्हा वाढ; कोणत्या खताच्या किंमतीत किती रुपयाने वाढ?
