सोलापूर : ११० फूट खोलीपर्यंतच्या विहिरी.. कोणाचा चारशे तर कोणाचा सहाशे फूट खोलीचा बोअर.. वीज असो अथवा नसो या बोअरचे पाणी आपोआप वाहू लागले आहे. बीबीदारफळ मधील हे वास्तव आहे अन् ते दररोज पडणाऱ्या धो-धो पावसामुळे.
तसा यंदा उत्तर तालुक्यात सर्वाधिक तर पाऊस आहेच शिवाय पाच ऑगस्टपासून अखंडपणे दररोज पडतोय. पावसाला सुटी, थकवा अथवा विश्रांती घ्यावीशी वाटत नाही का?, असा प्रश्न उत्तर तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे पडतो आहे.
ऐन मे महिना मध्यावर आला असताना १४ मे रोजी पावसाळा सुरू झाला. मे महिना असुनही असा काय पाऊस पडला की सगळीकडे पाणीच पाणी झाले.
ओढे वाहिले, विहिरी भरल्या, तलाव काठाला आले. ऐन मे महिन्यात शेतीपंप बंद ठेवावे लागले. जून-जुलै महिन्यात पावसाचा जोर थोडा कमी झाला मात्र वाढलेल्या पाणी पातळीत फार असा फरक पडला नाही.
ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने जोर धरला. पाच ऑगस्ट रोजी उत्तर तालुक्यातील काही मंडळात ९० मिमी तर काही मंडळात त्यापेक्षा कमी मात्र अतिवृष्टी झाली. त्यादिवशी तालुक्यात एकूण ७८ मिमी पाऊस पडला. त्यानंतर दररोजच पाऊस पडतोय.
ऑगस्ट महिन्यात उत्तर तालुक्यात २१३ मिमी पाऊस पडला आहे. याचे परिणाम उन्हाळ्यात पाण्याअभावी उचक्या मारणारे बोअर वरुन वाहू लागले आहेत.
बीबीदारफळ शिवारात अगदी उंच भागात शेती असल्याने सिंचनासाठी पाणी कमी पडू नये म्हणून ११० फूट खोल विहीर रामचंद्र बंडा ननवरे यांनी खोदलेली आहे. या विहिरीचे पाणी वरून वाहत आहे.
इतर अनेक विहिरींची अशीच स्थिती आहे. बागायतीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांकडे बोअर आहेत. यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांचे बोअर वरुन वाहू लागले आहेत.
चारशे ते सहाशे फूट खोल बोअर...अनील प्रल्हाद साठे, वसंत विश्वनाथ साठे, ज्ञानेश्वर बडीस साठे, विश्वनाथ केशव ननवरे, मोहन भीमराव साठे, चंदाराणी भाऊसाहेब साठे, मारुती शेंडगे व इतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील चारशे ते सहाशे फूट खोलीचे बोअरचे पाणी वरून वाहत आहे.
मे महिन्यापासून पाऊस पडल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. आता ऑगस्ट महिन्यातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे विहिरी काठोकाठ भरल्या आहेत. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात याचा फायदा होईल. - विश्वनाथ ननवरे शेतकरी, बीबीदारफळ
अधिक वाचा: e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अॅप