सांगली : यंदाच्या हंगामात हापूस आंब्याचे उत्पादन घटले असल्याचे चित्र आहे. परंतु बाजारात, गल्लीबोळात, अनेक रस्त्यांवर 'देवगड' हापूस लिहिलेल्या पेट्यांचे थर लागलेले दिसून येतात.
परप्रांतातला आंबा 'देवगड' हापूस लिहिलेल्या पेट्यांमध्ये घालून सर्रास विकला जात आहे. ग्राहकांची ही थेट फसवणूक सुरू आहे. परंतु, पणन विभागाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि जवळच्या परिसरातील हापूस आंब्याला 'जीआय' मानांकन जाहीर झाले आहे. या आंब्याचा दर्जा आणि गुणवत्ता ही मूळ भौगोलिक स्थानावरून ओळखली जाते.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या परिसरातील आंब्याची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरात पिकणारा हापूस हाच खरा हापूस आंबा यावर शिक्कामोर्तब झालेले आहे.
या आंब्याला एक नैसर्गिक सुगंध असतो. आतून केशरी आणि साल पातळ असते. तसेच जास्त रसाळ असतो. या प्रमुख वैशिष्ट्यांमुळे हा आंबा लोकप्रिय असतो.
या आंब्याची मागणी लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांत अनेकजण बनावटगिरी करून अन्य भागातील आंबा हापूस म्हणून ग्राहकांच्या माथी मारतात.
अनेक व्यापारी आंब्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वी देवगड हापूस असे लिहिलेले कोरोगेटेड बॉक्स मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. काही अतिहुशार व्यापारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी भागातील वर्तमानपत्राची रद्दीही खरेदी करतात.
कोकण परिसर वगळता इतर भागात पिकणारा आंबा 'देवगड हापूस' लिहिलेल्या पेटीत घालून त्याची राजरोस विक्री करतात. अनेक ग्राहकांना खरा हापूस आंबा ओळखता येत नाही.
ते पेटीवर देवगड हापूस लिहिलेले वाचून तो खरेदी करतात. त्यासाठी जादा पैसेही मोजतात. परंतु, त्यांना खऱ्या हापूसची चव चाखता येत नाही.
परराज्यातील आंबा हा कोकणात उत्पादित झालेला आहे किंवा देवगड, रत्नागिरी हापूस म्हणून विक्री करणे हे बेकायदेशीर आहे. मात्र कारवाईचे प्रमाण नगण्यच असल्याचे दिसून येते. केवळ इशारा देण्यापुरतीच जबाबदारी पार पाडली जाते.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि जवळच्या परिसरातील हापूस आंब्याला 'जीआय' मानांकन मिळालेले आहे असाच हापूस ग्राहकांनी खरेदी करावा. यंदा आंबा शेतकऱ्याचे हवामान बदलामुळे मोठे नुकसान झाले आहे. कोकणातील शेतकऱ्याला चांगले पैसे मिळावेत म्हणून कोकणातील हापूसच खरेदी करा.
देवगड हापूस म्हणून राजरोस विक्री करणारे संबंधित व्यापारी ग्राहकाची फसवणूक करतात. त्यामुळे ते गुन्हेगार ठरतात. तरीही बाजार समितीकडून त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. फळ मार्केटमध्ये अशा पेट्यांचे सौदे होतात. पणन मंडळही या फसवणुकीला जबाबदार आहे. - डॉ. ज्ञानचंद्र पाटील, ग्राहक पंचायत, सांगली
अधिक वाचा: आंब्यातील फळकुज, साका आणि फळमाशीसाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर