शिक्षण पूर्ण करूनही नोकरीच्या संधी मर्यादित असल्याने अनेक उच्चशिक्षित तरुण शेतीकडे वळताना दिसत आहेत. पारंपरिक शेतीऐवजी नवनवीन प्रयोग करत चांगले उत्पादन आणि नफा मिळवण्याचा प्रयत्न हे तरुण करत असून, असाच एक यशस्वी प्रयोग नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील जऊळके येथील उच्चशिक्षित शेतकरी अमोल सोनवणे यांनी करून दाखवला आहे.
सोनवणे यांनी ऐन थंडीच्या मोसमात खरबुजाची लागवड करून शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी केला आहे. एक एकर क्षेत्रावर खरबुजाची लागवड करत त्यांनी क्रॉपकव्हरचे आच्छादन वापरले असून, वेळोवेळी खते व औषधांची फवारणी केली आहे. या पिकासाठी आतापर्यंत सुमारे एक लाख रुपयांचा खर्च झाला असून, आता खरबूज पीक विक्रीसाठी तयार झाले आहे.
शेतीमध्ये कांदा, टोमॅटो, काकडी कोबी, फ्लॉवर यांची लागवड करत होतो. यावर्षी शेतात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेऊन एक एकर क्षेत्रावर खरबुजाची लागवड केली. औषधे, खते देऊन क्रॉपकव्हरचे आच्छादन टाकले. आतापर्यंत एक लाख रुपये खर्च आला असून, १५ ते २० टनापर्यंत उत्पादन निघून चांगले भाव मिळण्याची आशा आहे. - अमोल सोनवणे.
क्रॉपकव्हरचा प्रयोग ठरला फायदेशीर
• साधारणतः थंडीच्या दिवसांत दव, धुके व कमी तापमानामुळे पिकांची अपेक्षित वाढ होत नाही. त्यामुळे खरबुजाची लागवड प्रामुख्याने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत केली जाते.
• मात्र, त्या काळात उत्पादन मोठ्या प्रमाणावर येत असल्याने बाजारभावात चढउतार होतो.
• ही बाब लक्षात घेऊन सोनवणे यांनी नोव्हेंबर महिन्यातच नर्सरीतील रोपे आणून खरबूज लागवड केली. क्रॉपकव्हरमुळे दव व धुक्याचा परिणाम कमी झाला, तसेच औषध फवारणीचा खर्चही तुलनेने कमी झाला.
• परिणामी, ऐन जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच खरबूज विक्रीसाठी तयार झाले आहे.
१५ जानेवारीनंतरच खरबुजाची लागवड
• खरबुजाची लागवड शक्यतो शेतकरी १५ जानेवारीच्या पुढे करतात. कारण, थंडीमध्ये खरबुजाची उगवण क्षमता आणि वाढ पाहिजे अशी होत नाही.
• त्यामुळे १५ जानेवारीच्या पुढे उष्ण वातावरणात हे पीक चांगल्या प्रकारे घेऊन चांगले उत्पादन निघते.
• साधारणपणे १५ ते २० टनांपर्यंत उत्पादन एक एकर क्षेत्रामध्ये निघत असून, सध्या २५ ते ३५ हजार रुपये टनाप्रमाणे दर मिळत आहे. शेतकऱ्यांचा फायदा होतोय.
