गोकुळ भवरे
नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे पीक हातातून निसटले असून अनेक शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने आणि नदी-नाल्यांना पूर आल्याने पिकांसह शेतीची जमीन वाहून गेली.
तालुक्यात यंदा सरासरीच्या तब्चल १४९ टक्के पाऊस पडला असून ओला दुष्काळाचे संकट गडद झाले आहे. लाखोंचा खर्च करून लावलेली पिके उद्ध्वस्त झाली असून, बैंक कर्ज, खासगी उसनवारी आणि इतर खर्च कसा फेडायचा याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. अनेकांनी डोक्यावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे.
अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान
१३ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर नव्हता आणि प्रकल्पही भरले नव्हते. रब्बी आणि उन्हाळी हंगाम धोक्यात येईल अशी भीती असतानाच १६ ऑगस्ट रोजी अचानक झालेल्या ढगफुटीसदृश पावसानंतर सततच्या पावसाने खरीप पिकांची पूर्ण पडझड झाली.
तालुक्यातील ९ मंडळांमधील १७६ गावांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे खरीप हंगामातील ७९,९३२ हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ५६,६३४ हेक्टर जिरायत क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत.
एकूण ५८,५२६ शेतकऱ्यांपैकी ५१,४८८ शेतकरीबाधित झाले असून, संयुक्त अहवालाद्वारे ४८१ कोटी ३८ लाख ९० हजार रुपयांच्या मदतीची मागणी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. मदत वाटपासाठी खातेदारांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे.
सण असूनही मंदीचे सावट कायमच
"शासनाने दिलेल्या १३,६०० रुपयांच्या मदतीची रक्कम वाढवावी आणि दोन हेक्टरऐवजी मर्यादा तीन हेक्टरवर करावी," अशी मागणी घोटी येथील शेतकरी रामदास वाढई यांनी केली.
मानवी हानी व जनावरांचे मृत्यू
• पुरात तिघांचा मृत्यू झाला असून आणखी एक तरुण लक्ष्मण रणमाले (वय २२, घोटी) १६ ऑगस्टला वाहून असून तो अद्याप बेपत्ता आहे. एकाचा वीज पडून मृत्यू झाला असून तिघांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाखांची मदत देण्यात आली.
• विजेच्या धक्क्यातून जखमी झालेल्या दोघांना ५४ हजारांची मदत मिळाली आहे. एकूण ६० जनावरे दगावली असून ४२ जनावरांसाठी १०,३७,५०० रुपयांची मदत वाटप झाली आहे. १२ जनावरांची कार्यवाही सुरू असून ६ प्रकरणे अपात्र ठरली आहेत.
• ६०० घरांत पाणी शिरले होते, त्यापैकी ६३ कुटुंबांना ६.३० लाखांची मदत मिळाली. ६१ घरांची आणि ६ गोठ्यांची पडझड झाली; मात्र अद्याप मदत मिळालेली नाही.
सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान
सोयाबीन काढणीला आले होते; पण अतिपावसामुळे शेंगा सपाट पडल्या. जेथे दाणे भरले होते तिथे उगवणी सुरू झाली आहे. पीक पुराच्या पाण्यात एकदा नव्हे तर तीनदा बुडाले. अनेक शेतकऱ्यांचा सव्वा लाख रुपये खर्च पाण्यात गेला आहे.