धम्मपाल डावरे
शेतात साठवून ठेवलेला ३५ टन शेतकऱ्याचा कांदा अतिवृष्टीत पावसाचे पाणी शेडमध्ये गेल्याने खराब झाल्याचा प्रकार बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील कोठारबन येथे समोर आला असून एवढे नुकसान होऊनही वडवणी तहसील प्रशासन व कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी तसदी घेतली नाही.
त्यामुळे कांदा जागेवरच सडून शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वडवणीच्या तहसीलदारांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तालुक्यातील कोठारबन येथील शेतकरी तुळशीराम घुले यांच्या शेतामधील शेडमध्ये ३५ टन कांदा साठवून ठेवण्यात आला होता.
अतिवृष्टीत शेडमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कांदा खराब झाला. त्यांनतर शेतकऱ्याने नुकसानीचा पंचनामा व्हावा म्हणून कृषी व तहसीलच्या कर्मचाऱ्यांकडे चकरा मारल्या; परंतु त्यांनी दुर्लक्ष केले.
गेल्या काही दिवसांपासून वडवणी तहसील प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी कांद्याचा पंचनामा करण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार शेतकऱ्याने थेट वडवणी तहसीलदारांकडे केली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी मुजोर झाले असून, ते तहसीलदारांनाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.
संबंधित शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे साठवून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाल्याचे उशिरा सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या कांदा पिकाच्या नुकसानीचे पंचनामे लवकरच करण्यात येतील. - आर. के. सोनवणे, तलाठी, कोठारबन जि. बीड.
आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असून शेतात पिकविलेला कांदा अतिवृष्टीमुळे खराब झाला असून खराब झालेल्या कांद्याचे पंचनामे करण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. तहसीलदारांच्या नावे निवेदन दिलेले आहे. पीक नुकसानीचे पंचनामे न केल्यास आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे नाही. - तुळशीराम घुले, शेतकरी, कोठारबन.