राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाने महसूल विभागाच्या मदतीने तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवावा, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिले. शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुण्यात शुक्रवारी राज्यस्तरीय आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी कृषी आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, संचालक अशोक किरनळ्ळी, अंकुश माने, विनयकुमार आवटे, रफीक नाईकवडी उपस्थित होते. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २२ जिल्ह्यांमधील ८ लाख ७८ हजार ७६७हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
नुकसान (हेक्टरमध्ये)
बुलढाणा - ८९७७८
अमरावती - ३१८४६
यवतमाळ - ११८३५९
अकोला - ४३७०३
चंद्रपूर - २४१
वर्धा - ७७६
सोलापूर - ४१४७२
सांगली - ११९८
नाशिक - ४१९५
जळगाव - १२३२७
नांदेड - २८५५४३
हिंगोली - ४००००
परभणी - २०२२५
छ. संभाजीनगर - २०७४
जालना - ५१७८
बीड - १९२५
धाराशिव - २८५००
एकूण - ८७८७६७
योजनेतील निधी परत जाणार नाही
• कृषिमंत्री भरणे म्हणाले, "कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. अधिकाऱ्यांनी योजनांमधील बारकावे लक्षात घेऊन योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळेल याची काळजी घ्यावी. नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठीही प्रयत्न करावेत.
• कोणत्याही योजनेतील निधी परत जाणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन मिळावे यासाठी किसान कॉल सेंटर सुरू करावे.
• सर्वाधिक २ लाख ८५ हजार ५४३ हेक्टरवील नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून, यवतमाळ जिल्ह्यात १ लाख १८ हजार ३५९ हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसला आहे. भरणे यांनी यावेळी नुकसानीचा आढावा घेतला.