Harbhara Bhaji : आरोग्यवर्धक हरभऱ्याची(Harbhara) कोवळी भाजी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामुळे हिवाळ्यात(Winter) या भाजीचा आहारात समावेश करावा, असा सल्ला आहारतज्ज्ञांमार्फत देण्यात येतो. या भाजीला ग्रामीण भागात मोठी मागणी आहे.
पाऊस पडल्यानंतर विविध वनौषधी, सुगंधी वनस्पती, जंगली फळे, फुले, वेलवर्गीय भाज्या, कंदमुळे मिळत असतात; मात्र पाऊस संपल्यानंतर हिवाळ्यात सुरुवातीला जमिनीच्या ओलाव्यावर रब्बी पीक म्हणून हरभरा पिकाची लागवड केली जाते.
यंदा पावसाने सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची बुलढाणा जिल्ह्यात दोन लाख २६ हजार ७१८.२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक हरभरा पिकाचा समावेश असून, हरभऱ्याचे क्षेत्र १ लाख ५६ हजार ३६४ हेक्टरवर पोहोचले आहे. सध्या हरभरा पिकाची फवारणी, पाणी देणे सुरू असून, एक महिन्याचे पीक पूर्ण झाले आहे.
हंगामी पालेभाज्या आरोग्यासाठी उत्तम
■ हरभऱ्याची भाजी हिवाळ्याच्या हंगामात येते. हिवाळ्यामध्ये अनेक फळभाज्या घेतल्या जातात. या सर्व हंगामी भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात.
■ यंदाही हरभरा पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. हरभरा भाजीचे औषधी गुणधर्मा असल्याने हरभऱ्याची कोवळी पाने खुडून त्याची भाजी बनवतात.
रक्ताचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत
■ हरभरा वनस्पतींचे सर्व भाग उपयुक्त असून, प्रथिने व कार्बोहायड्रेट्स, तसेच जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. मधुमेह नियंत्रण राहतो. हरभरा भाजीमध्ये जीवनसत्त्व 'क', 'ब', फोलेट यांचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे जर हरभऱ्याचा समावेश आहारात केला, तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.
आहारतज्ज्ञ काय सांगतात
जेवणामध्ये हरभऱ्याचा कोवळा पाला, पीठ व डाळ यांचा भरपूर उपयोग करावा. हरभऱ्याच्या भाजीमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे आणि प्रथिने असतात. यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. हरभरा भाजीमध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट्समुळे शरीराचा थकवा दूर होऊन ऊर्जा मिळते, तसेच भाजीतील लोह हे रक्ताच्या कमतरतेपासून बचाव करते. त्यामुळे हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी लाभदायक आहे. - डॉ. पुजा तेरेदेसाई, आहारतज्ज्ञ
शेतकरी म्हणतात?
गेल्या ७ ते ८ दिवसांपासून हरभरा पिकाच्या कोवळ्या पाल्याची भाजी विक्रीला येत आहे. शेतकरी आपल्या परीने शेतातून जुड्या आणून ठरलेल्या खवय्यांना विकतात. यातून दिवसभराची मजुरी मिळत आहे. - विनायक बोदडे, भाजी विक्रेते
हे ही वाचा सविस्तर : हरभरा पिकातील मर रोगाच्या नियंत्रणासाठी प्रभावी जैविक उपाय कोणते? वाचा सविस्तर