शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी समृद्धी योजनेंतर्गत विविध आधुनिक यंत्रसामग्री आणि पायाभूत सुविधांवर अनुदान दिले जात आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उमेद अभियानातील महिला ग्राम संघांनी १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे.
कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवून उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, हवामान अनुकूल शेतीला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या विविध बाबींचा समावेश केला आहे.
कृषी समृद्धीतील घटकाचे अनुदान देताना शासनाच्या सूचना, निकष व मापदंडानुसार थेट लाभ हस्तांतरण डीबीटी तत्त्वावर, तसेच कृषी विभाग, आत्मा, स्मार्ट, रेशीम विभाग, पशुसंवर्धन विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडील प्रचलित योजनेनुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे .
योजनेंतर्गत उपलब्ध बाबी
सदरील योजनेत शेतीसाठी फवारणी ड्रोन, टोकण पद्धतीने पेरणीसाठी टोकण यंत्र, सेंद्रिय शेतीसाठी टेन ड्रम थिअरी, ५०० मेट्रिक टन क्षमतेचे सामूहिक कांदा साठवण गृह, इलेक्ट्रिक हॉट एअर ड्रायर, १००० ते २००० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम, मिल्क मशीन, रेशीम उद्योगासाठी चौकी सेंटरचे अपग्रेडेशन आणि सीताफळ, आंबा, जांभूळ यांसारख्या फळांसाठी पल्प मशीन उभारणीसाठी अनुदान मिळणार आहे. आत्माअंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, उमेद अभियान अंतर्गत स्थापित महिला ग्राम संघ यांना सामूहिक लाभदिला जाणार आहे.
...असा मिळले लाभ
• योजनेतील अनुदान थेट लाभहस्तांतरण डीबीटी पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाईल.
• बीड जिल्ह्यातील वैयक्तिक लाभार्थी, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, उमेद अभियानअंतर्गत स्थापित महिला ग्राम संघ यांनी या सुवर्णसंधीचा लाभघेण्यासाठी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी अधीक्षक सुभाष साळवे यांनी केले आहे.
अर्ज कुठे करायचा?
• शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत लाभ देण्यात येत आहे. मात्र, त्यांनी वेळेवर अर्ज करणे गरजेचे आहे.
• इच्छुकांनी विविध घटकांसाठी वेगवेगळ्या कार्यालयात अर्ज सादर करावे लागतील.
• फवारणी ड्रोनसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मिल्क मशीनसाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय, अपग्रेडेशनसाठी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालय आणि पल्प मशीनसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात अर्ज करावेत.
• तसेच, ड्रोन, टोकण यंत्र, टेन ड्रम थिअरी, कांदा चाळ आणि गोदाम उभारणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करता येतील.
