खरीप हंगामातील पिके पावसाने गेल्याने लातूर जिल्ह्याच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ येथील शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकावर लक्ष्य केंद्रित केले आहे. सुरुवातीच्या काळातील दुष्काळी परिस्थितीत पाणी कमी असून ही अनुकूल वातावरणामुळे संपूर्ण डिगोळ, सुमठाना परिसरात पिके जोमदार होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे ही पिके धोक्यात आली आहेत.
यावर्षी चांगला पाऊस झाल्याने गव्हू ज्वारी हरभऱ्याचे पिके अधिक उत्पादन देतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. विशेष म्हणजे, तालुक्यात गहू व ज्वारीच्या तुलनेत हरभऱ्याचे पेरणीक्षेत्र अधिक आहे. तालुक्यात आठवडाभरापासून सततचे ढगाळ वातावरण झाल्याने हरभऱ्याच्या पिकावर 'मर व लष्करी' अळींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, यात झपाट्याने वाढ होत आहे.
एका झाडावर किमान ते १ ते २ अळ्या आढळून येत आहेत. दोन्ही अळींची हरभऱ्याच्या झाडांची संपूर्ण पाने व शेंडे खाऊन फस्त केल्याने शेतात केवळ हरभऱ्याच्या काड्या शिल्लक राहणार आहेत. आणखी काही दिवस ढगाळ वातावरण असेच राहिल्यास या दोन्ही अळींचा प्रादुर्भाव व पिकांच्या नुकसानीची पातळी वाढू शकते, अशी शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवले आहे.
महागडी कीटकनाशके निरुपयोगी...
हरभऱ्यावरील रोग नियंत्रणासाठी महागड्या व जहाल कीटकनाशकांची दोन ते तीनदा पिकावर फवारणी केली. मात्र, या अळ्या नियंत्रणात येत नाहीत. अशी माहिती योगेश वाडकर या हरभरा उत्पादकांनी दिली असून, आपले दुहेरी नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
हरभरा पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे शेतातील पिकांमध्ये मादी पतंगाने अंडी घालू नये, यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. - संभाजी सूर्यवंशी, कृषी सहायक.
थंडीही वाढतेय...
मागील आठ दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत असल्याचे चित्र आहे. कधी आभाळ येतंय तर कधी थंडी वाढत असल्याने पिकांवर परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
