पुणे : नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ मधील नुकसान भरपाई आली आहे.
आंबिया बहरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून आतापर्यंत ८६० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
उर्वरित रक्कमही लवकरच वितरित होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. त्यामुळे अनिश्चित हवामानामुळे आर्थिक फटका बसलेल्या फळउत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
हवामानातील विविध धोक्यांमुळे फळपिकांना मोठा फटका बसत असतो. पिकांचे उत्पादन कमी होते. यात शेतकऱ्यांचे नुकसानही मोठे होते.
पिकांचे नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळावी यासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येते. आंबिया बहारमध्ये आंबा, डाळिंब, केळी, पपई, संत्रा, द्राक्ष, मोसंबी आणि स्ट्रॉबेरी या पिकांसाठी योजना राबविण्यात येते.
राज्यात विविध जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात आली होती. हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२४-२५ मधील आंबिया बहरात शेतकऱ्यांनी २ लाख ३९ हजार अर्ज केले होते. त्यापैकी पडताळणीत २७ हजार ८२२ अर्ज अपात्र ठरले.
तर २ लाख ११ हजार अर्ज भरपाईसाठी पात्र ठरले होते. या अर्जापोटी शेतकऱ्यांना ८६० कोटी ४० लाख रुपये वितरित करण्यात आले. तर उरलेली रक्कम लवकरच जमा करण्यात येईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.
हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२४-२५ मधील आंबिया बहरासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलियान्झ, युनिव्हर्सल सोम्पो आणि फ्यूचर जनरली या कंपन्यांना अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली होती.
यामधून भारतीय कृषी विमा कंपनीने सर्वाधिक भरपाई वितरित केली असून, ७४९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. त्यापाठोपाठ बजाज अलियान्झने ९० कोटी ८६ लाख रुपये, तर युनिव्हर्सल सोम्पोने २० कोटी ५० लाख रुपये इतकी भरपाई दिली आहे.
अधिक वाचा: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेत 'हा' महत्वपूर्ण बदल; आता लाभ लगेच मिळणार
