अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोकळा कांदाबाजार पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी तसेच वाढीव वाराई रद्द करण्याच्या हेतूने शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी महिला आघाडीच्या वतीने सहायक निबंधक श्रीरामपूर यांच्या कार्यालयासमोर आज मंगळवार (दि.२६) घेराव आंदोलन करण्यात आले.
शेतकरी डम्पिंग ट्रॉलीद्वारे कांदा बाजारात आणतात त्याचे वजन प्लेट काट्यावर करून पावतीचे पैसेही शेतकरीच भरतात. तसेच लिलावानंतर पुन्हा ट्रॉलीत भरण्याचा व खाली करण्याचा संपूर्ण खर्चही शेतकऱ्यांकडूनच केला जातो. याशिवाय ट्रॉली एका खटक्याने खाली होते त्यामुळे हमालांचा प्रत्यक्ष श्रम लागत नाही. त्यामुळे "नो वर्क, नो वेजेस" या तत्वानुसार शेतकऱ्यांवर हमाली-मापाई लादणे बेकायदेशीर असल्याची भूमिका शेतकरी संघटना यांनी मांडली आहे.
दरम्यान मोकळा कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांना कांदा गोण्यांमध्ये विक्रीसाठी आणावा लागत असून त्यामुळे त्यांना प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. त्याउलट मोकळ्या कांद्यासाठी केवळ ८० ते ९० रुपये खर्च येतो. शिवाय शेजारच्या तालुक्यांच्या तुलनेत श्रीरामपूर बाजारात ३०० ते ४०० रुपयांनी कमी भाव मिळतो आहे. यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी लूट होत असल्याचे शेतकरी संघटनांनी निदर्शनास आणून दिले.
सहायक निबंधक गडेकर यांनी तत्काळ हस्तक्षेप करत बाजार समितीचे सभापती व सचिव यांच्याशी संपर्क साधून येत्या दोन-तीन दिवसांत शेतकरी, व्यापारी, हमाल-मापारी, शेतकरी संघटना प्रतिनिधींची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. विशेष की हि बैठक गडेकर यांच्या उपस्थितीत होणार असून मोकळा कांदा बाजार लवकरच सुरू होईल अशी शक्यता आहे.
आजच्या आंदोलनामुळे श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झालेली कांदा कोंडी फोडण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून या आठवड्यात बंद केलेला मोकळा कांदा बाजार पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आजच्या या आंदोलनात शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीताताई वानखेडे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, कोमल वानखेडे, मंदा गमे, आशाताई महांकाळे, शीतल पोकळे, सुनीता अमोलीक, सुनंदा चोरमल, शीला वानखेडे, सोनाली विटेकर, युवा आघाडीचे मयूर भनगडे, मधू काकड, बाळासाहेब घोगरे, अशोक आव्हाड, विष्णू भनगडे, रंगनाथ पवार, अर्जुन दातीर, श्रीराम त्रिवेदी, बाबासाहेब गायकवाड, अंबादास गमे, संतोष दातीर, भानुदास चोरमल, नीलेश जाधव, गणेश अदीक, जगदीश खरात, युवराज देवकर यांच्यासह पंचक्रोशीतील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोकळा कांदा बाजार बंद करून शेतकऱ्यांची कांदा कोंडी केली जात आहे. येत्या दोन दिवसांत हि कोंडी सोडली नाही तर शेतकरी संघटना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. तसेच शेतकऱ्यांना मोकळा कांदा विक्रीसाठी शेजारच्या नाशिक, संभाजीनगर जिल्ह्यातील बाजार समित्यांत जावं लागतं असल्याने श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूरचे शेतकऱ्यांसाठी असून अडचण नसून खोळंबा झाली आहे. - नीलेश शेडगे जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना,स्वतंत्र भारत पक्ष अहिल्यानगर.