मराठवाड्यात ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी शुगर्सने यंदाच्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात चौथा वाढीव हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा हप्ता १०० प्रति मेट्रिक टन याप्रमाणे असणार आहे.
कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे आणि व्हाइस चेअरमन महेंद्र मेठी यांनी हा शेतकरी हितार्थ निर्णय जाहीर केला आहे. ज्यामुळे सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. या घोषणेमुळे संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या तोंडावर हा वाढीव हप्ता मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक चणचण दूर होणार असून, त्यांना सण उत्साहात साजरा करता येणार आहे.
जालना जिल्ह्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. समृद्धी कारखान्याकडून १०० रुपये प्रति मेट्रीक टनाप्रमाणे दर जाहीर केल्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
उच्चांकी दर देण्याचा समृद्धीचा पॅटर्न
• समृद्धी शुगरने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाला दोन हजार ९७० प्रति मेट्रिक टन इतका उच्चांकी भाव जाहीर केला आहे. या उच्चांकी दरामुळे समृद्धी साखर कारखाना मराठवाड्यात दर देण्याच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिला आहे.
• चौथ्या वाढीव हप्त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणासाठी मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना पहिला हप्ता २ हजार ५००, दुसरा २०० रुपये, तिसरा हप्ता १००, तर चौथा हप्ता १०० रुपये प्रति मेट्रीक टनाचा हप्ता जाहीर केलेला आहे.