नाशिक : मागील महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीपिकांच्या झालेल्या (Nuksan Bharpai) नुकसानीची अंतिम आकडेवारी कृषी विभागाने जाहीर केली. त्यानुसार अंतिम आकडेवारी नुकसानीची २ लाख ९९ हजार ८०६ हेक्टरवरील पिकांची आहे. तर ३२८ कोटी ६७ लाख रुपये नुकसानभरपाई ४ लाख २७ हजार ५८० शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई (Crop Damage) जमा होईल का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल. १५३१ गावांतील तब्बल २ लाख ८६ हजार २१८ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज मागील आठवड्यापर्यंत होता. १५ तालुक्यांत नुकसानाची नोंद झाली असून, अतिवृष्टीमुळे कांदा, द्राक्षबाग, फुलशेती तसेच भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यातील २५३ तालुक्यांना सरसकट मदत देण्यात येणार आहे. अशी मदत जाहीर झालेला जिल्ह्यातील एकही तालुका नाही. दिवाळीआधी शेतक-यांना मदत देण्यासाठी तातडीने निधी मंजूर व्हायला हवा, अशी अपेक्षा आहे. मदत निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
इगतपुरी, त्र्यंबक तालुक्यात अधिक हानी
जिल्ह्यातील इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, येवला तालुक्यांत ५० हजार हेक्टरहून अधिक जमिनीवर पिकांचे नुकसान झाले आहे. येथील पंचनामे सर्वात उशिरा झाले. तर मालेगाव, नांदगाव तालुक्यांत कापूस पिकांचे ९ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात नुकसान झाले आहे.
कांदा उत्पादकांनाही भरपाई
कांदा पिकाचेही मोठे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले. चाळीत साठवून ठेवलेला कांदा ओला झाला. तसेच नवीन पीक लावले होते ते खरडून काढण्याची वेळ अनेक ठिकाणी आली. मात्र, पंचनाम्यात कांदा पिकाचेही तीन नंबरचे नुकसान झाले आहे. मका, सोयाबीन पिकांची सर्वाधिक हानी झाली.